दोन अधिकाऱ्यांची मुलेही बडतर्फ
By admin | Published: March 4, 2017 01:22 AM2017-03-04T01:22:51+5:302017-03-04T01:23:03+5:30
नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालयातभरतीत नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या पद्धतीने झालेल्या भरतीत बडतर्फ करण्यात आलेल्या सहा जणांपैकी दोन जण मुद्रणालयातील अधिकाऱ्यांचे मुले आहे.
नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालयात वर्षभरापूर्वी झालेल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या भरतीत नियमांचे उल्लंघन करत चुकीच्या पद्धतीने झालेल्या भरतीत बडतर्फ करण्यात आलेल्या सहा जणांपैकी दोन जण मुद्रणालयातील अधिकाऱ्यांचे मुले असल्याचे समोर आले आहे.
भारत प्रतिभूती मुद्रणालयात वर्षभरापूर्वी छपाई (प्रिंटिंग) विभागाकरिता कनिष्ठ अधिकारी (सुपरवायझर) या पदाकरिता मुंबईत भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. प्रिंटिंग विभागाकरिता भरती करावयाची असताना मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल अशा जागांसाठी भरतीप्रक्रिया दाखविण्यात आली. प्रिंटिंग डिप्लोमा शिक्षण आवश्यक असताना इतर जागा दाखवून त्या शैक्षणिक पदविकाधारक उमेदवारांना भरती करून घेतले होते. याबाबत भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांनी मुद्रणालय महामंडळाच्या चीफ व्हिजिलन्स विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांची दखल घेऊन या भरतीप्रक्रियेत चौकशी करण्यात आल्यानंतर चुकीच्या पद्धतीने भरतीप्रक्रिया राबविण्यात आल्याचे उघडकीस आले.
या भरती घोटाळ्याची गंभीर दखल घेऊन मुद्रणालय महामंडळाने चार दिवसांपूर्वी कुणाल भिकाजी गोलप (मुरबाड, कल्याण), अभिषेक इंद्रजित पाल (औरंगाबाद), आशिष सुरेश शेंडे (चंद्रपूर), मृणाल अनिल जंगले (नाशिकरोड), कैलास खेलूकर (चाटोरी, निफाड), नवल किशोर पाल (जेलरोड नाशिकरोड) या सहा कनिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे मृणाल जंगले यांचे वडील अनिल जंगले हे भारत प्रतिभूती मुद्रणालयात कंट्रोल विभाग प्रमुख व महामंडळाच्या ९ युनिटच्या इस्टेट विभागांचे मुख्य अधिकारी आहेत.
तर नवल पाल यांचे वडील किशोर पाल हे चलार्थपत्र मुद्रणालयात अधिकारी असल्याचे समोर आले आहे. यामुळे मुद्रणालय व महामंडळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)