कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:14+5:302021-05-20T04:15:14+5:30

नाशिक : कोरोनामुळे माता-पित्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांचा कायदेशीरीत्या सांभाळ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने नियोजन ...

Children who have lost their parents due to covid will get support | कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

Next

नाशिक : कोरोनामुळे माता-पित्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांचा कायदेशीरीत्या सांभाळ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सामाजिक संस्थांच्या मदतीने नियोजन केले आहे. वयाच्या अठरा वर्षापर्यंत अशा बालकांचे संगोपन केले जाणार असून, ज्या मुलांचे माता-पिता कोविडचा उपचार घेत आहेत, अशा बालकांचा तात्पुरता सांभाळदेखील केला जाणार आहे.

कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेली मुले अनाथ झाल्यानंतर बालकामगार, बेकायदेशीर दत्तक तसेच मानवी तस्करीला ते बळी पडू शकतात. असा प्रसंग या बालकांच्या आयुष्यात येऊ नये यासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून मुलांच्या संगोपनासाठी नियोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात मुलांचे संगोपन करण्यासाठी चार संस्थांची निवड करण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित झाले तर या महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. उपचारादरम्यान माता-पित्यांचा मृत्यू झाल्याने अनेक चिमुरड्यांवर आभाळच कोसळले आहे. काहींचे आई-वडील दोघेही बाधित असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागते अशावेळी त्यांच्याही बालकांची परवड होते. या भयावह संकटांचा मुलांवर दुरगामी परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांना आधार देण्याबरोबरच, त्यांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने उपायोजना केली आहे.

अशा मुलांना शहरातील आधाराश्रम, शेल्टर डॉन बॉस्को बॉम्बे सेल्शियन सोसायटी, मुलींचे निरीक्षणगृह, बालगृह, शासकीय मुलींचे अनुरक्षणगृह या ठिकाणी सामावून घेतले जाणार आहे. शहरातील विविध भागात या संस्था शासनाच्या देखरेखीखाली सुरू असून, वयाच्या अठरा वर्षांपर्यंत या संस्था अशा बालकांचा सांभाळ करणार आहे. कोविडमुळे बालकांवर ओढवलेल्या प्रसंगासाठी शासनाकडून नियोजन करण्यात आले आहेच शिवाय बालकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची माहिती देण्यासाठीदेखील सहा संस्थांची मदत नागरिकांना घेता येणार आहे.

--इन्फो--

बालकांशी संबंधित संस्था

१) चाइल्डलाइन : हेल्पलाइन १०९८

२) महिला व बालविकास विभाग : ८३०८९९२२२२/७४०००१५५१८

३) बालकल्याण समिती : ०२५३-२३१४५९८/९९२२६१६२८०

४) जिल्हा महिला व बालविकास अधिकारी : ०२५३- २२३६३६८

५) जिल्हा बालसंरक्षण कक्ष : ०२५३-२२३६२९४

६) समन्वयक, जिल्हास्तरीय कृती दल : ९७६२३१३१५६ (व्हॉट‌्सॲप)

--कोट--

बालकांची काळजी घ्यावी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ्जांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे बालकांमध्ये कोरोनाविषयक काळजी घेण्याची सवय रुजविणे अपेक्षित आहे. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर तसेच हातधुणे याबाबत पालकांनी मुलांनी साक्षर केले पाहिजे. मुलांची अधिक काळजी घेण्याची जबाबदारी असल्याने पालकांनी स्वत:ला काेरोना होणार नाही याची काळजी प्राधान्याने घेतली पाहिजे.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Web Title: Children who have lost their parents due to covid will get support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.