कोरोनाकाळात बोलले बाहुले अन् शिकली मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:16 AM2021-01-03T04:16:27+5:302021-01-03T04:16:27+5:30
नाशिक : कोरोनाकाळात शिक्षणाची ज्ञानगंगा खंडित होणार की काय, अशी साशंकता निर्माण झालेली असताना ऑनलाइनसारखे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करीत ...
नाशिक : कोरोनाकाळात शिक्षणाची ज्ञानगंगा खंडित होणार की काय, अशी साशंकता निर्माण झालेली असताना ऑनलाइनसारखे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करीत बोलक्या बाहुल्यांच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना खिळवून ठेवत शिक्षणाचे धडे देणाऱ्या नलिनी अहिरे आधुनिक युगातील सावित्रीच ठरल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात मुले शिकणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच ऑनलाइन शिक्षणाची भन्नाट कल्पना समोर आली आणि पदवीपासून पहिली, दुसरीत असलेल्या नवपिढीने अक्षरश: डिजिटल युगातच प्रवेश केला. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. मोबाइलचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याचा, मानसिक ताण आणि नेत्रविकार उद्भवण्याचा प्रश्न निर्माण झाला. तसेच मुले मोबाइलच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली. यातून मार्ग काढत ओझरजवळील बाणगंगा शाळेत शिक्षिका असलेल्या नलिनी अहिरेबागुल या प्राथमिक शिक्षिकेने विद्यार्थ्यांना कमी वेळात अधिक प्रभावीपणे शिक्षण देण्यासाठी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून शिकविण्यास सुरुवात केली आणि बघताबघता विद्यार्थी आणि पालकांचाही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन अभ्यासाची-शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात त्यांना यश आले.
इन्फो-
पदरमोड करून प्रयोग, कुुटुंबाचीही लाभली साथ
ऑनलाइन शिक्षणपद्धतीत रंजकता आणून स्वखर्चाने या बोलक्या बाहुल्या (पपेट) तयार केल्या. या कामात त्यांना पती राजेंद्र, भाऊ दिगंबर व दीपक यांची मोलाची मदत मिळाली. टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना लक्षात घेत त्यांनी बोलक्या बाहुल्या तयार करण्यासाठी लागणारे कापड आडगाव परिसरातील शिवणकाम व्यावसायिकांकडून जमवले. याकामी मैत्रीण वृषाली दुसाने यांनी त्यांना मदत केली आणि बोलक्या बाहुल्या आकारास आल्या.
इन्फो
अवघड विषयही झाले सोपे
वेगवेगळ्या विषयांनुसार विविध प्रकारच्या बाहुल्यांचा वापर त्यांनी ऑनलाइन शिक्षणासाठी केला आणि एखाद्या चित्रपट किंवा नाटकामध्ये रममाण व्हावे तसे विद्यार्थी त्यांच्या ऑनलाइन वर्गात रमू लागल्याने त्यांचा हा उपक्रम आजही सुरू आहे. ४ जानेवारीपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहे. मात्र, यात प्राथमिक शाळांचा समावेश नाही. त्यामुळे यापुढेही बोलक्या बाहुल्यांच्या प्रयोगांतून ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवणार असल्याचे नलिनी अहिरे यांनी सांगितले. (फोटो ०२ नलीनी अहिरे)