तिसऱ्या लाटेपूर्वी बालकांचे करणार लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 01:32 AM2021-05-26T01:32:43+5:302021-05-26T01:33:55+5:30
देशपातळीवर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांना धोका असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या इतर आजारावरील लसीकरण तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
नाशिक : देशपातळीवर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांना धोका असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असल्याने जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या इतर आजारावरील लसीकरण तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना व त्यातल्या त्यात १२ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या लाटेपासून बालकांचा बचाव करण्यासाठी आतापासूनच शासन पातळीवर उपाययोजना तसेच बालरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात असून, या लाटेचा फटका लहान बालकांनाही बसू शकतो, असे गृहित धरून त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. नाशिक जिल्हा परिषदेनेदेखील शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाला सूचना केल्या आहेत. बाळाच्या जन्मापासून ते साडेचार वर्षांपर्यंत अनेक आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरण केले जाते. त्यात कावीळ, गोवर रूबेला, हिपेटायटिस-बी, पंचगुणी, बीसीजी अशा लसींचा समावेश आहे. शहरी भागातील पालकांमध्ये बालकांचे लसीकरणासाठी जागरूकता असली तरी, ग्रामीण भागात व विशेषत: दुर्गम भागातील जनतेकडून याबाबत हलगर्जी केली जाते. त्यामुळे अशा बालकांना संभाव्य कोरोनापासून बचावण्यासाठी त्यांचे उर्वरित अपूर्ण असलेले लसीकरण करण्याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या आहेत. या संदर्भात महिला व बाल कल्याण विभागानेदेखील शुक्रवारी ऑनलाइन बैठक बोलविली असून, त्यात तालुका वैद्यकीय अधिकारी, बाल प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, एनएम यांचा समावेश आहे.
चौकट====
कुपोषित बालकांवर लक्ष
जिल्ह्यातील आदिवासी भागात कुपोषित बालके असून, कोरोनाने यापूर्वीच आदिवासी भागात शिरकाव केला आहे. कुपोषित बालकांवर कोणताही आजार तत्काळ प्रभाव करू शकतो. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी महिला व बाल कल्याण विभागाने तयारी केली असून, त्यासाठी अशा बालकांच्या आरोग्याबरोबरच पोषण आहाराचे नियमित वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- दीपक चाटे, महिला व बाल विकास अधिकारी.