‘रासाका’ची चिमणी पेटणार; ‘निसाका’ संकटातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:20+5:302021-05-19T04:15:20+5:30

ओझर : निफाड तालुक्यातील सहकारी तत्त्वावर असलेल्या दोन कारखान्यांच्या चिमण्या अनेक वर्षांपासून बंद असताना यंदा रासाकाच्या चिमणीतून धूर निघण्याचे ...

The chimney of ‘Rasaka’ will ignite; ‘Nisaka’ in crisis | ‘रासाका’ची चिमणी पेटणार; ‘निसाका’ संकटातच

‘रासाका’ची चिमणी पेटणार; ‘निसाका’ संकटातच

Next

ओझर : निफाड तालुक्यातील सहकारी तत्त्वावर असलेल्या दोन कारखान्यांच्या चिमण्या अनेक वर्षांपासून बंद असताना यंदा रासाकाच्या चिमणीतून धूर निघण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. मात्र, आर्थिक विवंचनेत पडून असलेला निफाड साखर कारखाना राजकीय संकटात सापडलेला आहे.

निफाडच्या साखरेचा गोडवा एकेकाळी राज्यात चर्चेचा विषय होता. त्यात निसाकाची कामगिरी तर अटकेपार चर्चिली जात होती. पाच हजार टनांपर्यंत गाळप क्षमता असलेला निसाका गत आठ वर्षांपासून भग्नावस्थेत आहे. गत दोन दशकात तानाजी बनकर, माणिकराव बोरस्ते, डॉ. वसंत पवार यांची कारकीर्द चांगलीच गाजली. मालोजीराव मोगल यांच्या वरचा अविश्वास ठराव, परेश ठक्कर चेक बाउन्स प्रकरण व बंद पडण्याआधी शेवटच्या टप्प्यात जवळपास तीन लाख पोते कच्ची साखर कवडीमोल भावात विकण्याच्या प्रकरणाने निफाडच्या सहकाराला ग्रहण लागले. ते अद्यापपावेतो सुटलेले नाही. मोठ्या आर्थिक कचाट्यात रुतलेल्या निसाकाला सुरुवातीला ओबेरॉय यांच्या बॉम्बे फायनान्स कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले होते. परंतु मंत्रालयात माशी शिंकली आणि त्याला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर सुरू झालेल्या स्थानिक श्रेयवादाच्या लढाईत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील साई शुगरने निसाका ताब्यात घेण्याचा मनसुबा विधानसभा निवडणूकपूर्वी आखला. त्यांनी जिल्हा बँकेत रक्कमदेखील भरली परंतु स्वतःची आर्थिक स्थिती गंभीर असताना त्यांनी निसाका घेण्याचा प्रयत्नच अधिक चर्चिला गेला. सध्या जिल्हा बँक आणि साई शुगरमधील भरणा केलेल्या पैशांवरून टोकाची लढाई सुरू असल्याचे समजते. रासाकामध्ये दोनशे तर निसाकात १२५०च्या जवळपास कामगार कार्यरत होते.

इन्फो

रासाकाचे नोव्हेंबरमध्ये अग्निप्रदीपन?

रानवड साखर कारखाना हा बाराशे टन क्षमता असलेला कारखाना आहे. तोदेखील गत पाच वर्षांपासून बंद होता. त्यात दुसऱ्या जिल्ह्यातील नेत्यांच्या समूहांनी इथे येत आपली पोट भरून कामगारांची देणी थकवली. परंतु आता निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या पतसंस्थेला हा कारखाना चालवण्यास मिळाल्याने निफाडच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यानुसार युद्धपातळीवर रासाका स्थळ गळीत हंगामासाठी तयार होत असून, दोन महिन्यात तो सक्षमपणे उभा राहून गळीत हंगामासाठी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याचे अग्निप्रदीपन दृष्टिक्षेपात आहे.

इन्फो

ड्रायपोर्ट प्रकल्पाची स्टंटबाजी

रासाका सुरू होण्याचा काटेरी रस्ता सुकर झाला. परंतु निसाकाच्या देणेदारीला पर्याय म्हणून तेव्हा मोकळ्या जागेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घोषित झालेला ड्रायपोर्ट प्रकल्प हा राजकीय स्टंट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भौगोलिक दृष्ट्या काही अटी अशक्य असल्याने तो बासनात गेल्यात जमा असताना आता त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासंबंधी लवकरच बैठक घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. यात निसाकावरचा करांचा, व्याजाचा डोंगर काही प्रमाणात शिथिल केल्यास तो टर्निंग पॉइंट होऊ शकतो. त्यामुळे हे वर्ष साखरेचा गोडवा दाखवणारे वर्ष ठरेल, असा विश्वास ऊस उत्पादकांनी व्यक्त केला आहे.

कोट...

रासाका कार्यस्थळावर काम प्रगतिपथावर सुरू आहे. पुढील दोन महिन्यात गळीत हंगामासाठी तो तयार होईल. त्यानंतर दिवाळीत शासनाचे आदेश आल्यावर लगेच गाळप सुरू करणार आहोत. निसाकाबाबतीत दोन संस्थांमधील वाद असल्याने तो वाद मिटल्यास त्यासाठीही आमची संस्था प्रयत्नशील आहे.

- रामभाऊ माळोदे, चेअरमन, अशोक बनकर पतसंस्था

कोट...

रासाका सुरू होत असल्याचे समाधान आहे. पण निसाकादेखील दृष्टिक्षेपात यायला हवा. आम्ही कामगार म्हणून कित्येक वर्ष रक्ताचे पाणी करून काम केले आहे. साखर कारखानदारीत निसाका हा सिंह होता.परंतु सहकारात राजकारण आले. त्यातून गैरप्रकार घडले आणि आमचे संसार रस्त्यावर आले. आम्ही अजून अपेक्षा सोडलेली नाही.

- विजय रसाळ, अध्यक्ष, निसाका कामगार सभा

Web Title: The chimney of ‘Rasaka’ will ignite; ‘Nisaka’ in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.