दापूर शाळेत विद्यार्थिनीने वाचविले चिमणीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 05:59 PM2020-01-16T17:59:42+5:302020-01-16T18:00:16+5:30
सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीत शिकणारी प्रियंका मोरे या विद्यार्थिनीने शाळेच्या प्रांगणात जखमी झालेल्या चिमणीचे प्राण वाचविले.
सकाळी अभ्यासिकेच्यावेळी शाळेच्या पटांगणावर चिमणीचे पिल्लू अचानक पडले. त्या चिमणीच्या पिल्लाला कावळा टोच मारून जखमी करीत होता. त्याक्षणी प्रियंकाने कावळ्याला हुसकावून लावले व जखमी चिमणीला पकडून क्रीडाशिक्षक ए. बी. सय्यद यांच्याकडे आणले. जखमी अवस्थेत ओरडणाऱ्या चिमणीला पाहून प्रियंकाचे मन व्याकूळ झाले. चिमणीला वाचवण्यासाठीची धडपड बघून सर्व शिक्षक अचंबित झाले. सगळ्यांनाच गहिवरून आले.जखमी अवस्थेत ओरडणा-या चिमणीच्या पिलाला वाचविण्यासाठी बी. एस. खाडे यांनी हळद आणली व ती हळद प्रियंकाने चिमणीच्या जखमेवर लावली. तिला पाणी पाजले. त्या चिमणीला विद्यालयाच्या परिसरात लावलेल्या घरट्यामध्ये ठेवण्यात आले. शाळा सुटल्यावर तिने त्या चिमणीच्या पिलाला खाण्यासाठी दाणे आणले. दिवसभरात विद्यालयात घडलेली ही खूपच हृदयस्पर्शी बाब ठरली. मुख्याध्यापक गोकुळ देसाई,पर्यवेक्षक भाऊसाहेब गुंजाळ, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष श्रीराम आव्हाड, उपाध्यक्ष मोहन काकड, कचरू आव्हाड, रामदास आव्हाड, रामदास सानप यांनी प्रियंकाचा सत्कार केला.