आश्रमशाळेच्या चिमूकल्यांनी भागविली मुक्या जीवांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 08:59 PM2021-03-18T20:59:39+5:302021-03-19T01:22:04+5:30
पेठ : मार्च महिन्याचे तळपते ऊन आणि रानावनात भटकणाऱ्या पशुपक्ष्यांची अन्नपाण्याशिवाय होणारी उपासमार लक्षात घेऊन पेठ तालुक्यातील आडगाव (भू.) आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या संकल्पनेतून टाकाऊपासून टिकाऊ पाणवठे तयार करून मुक्या जीवांची तहान-भूक भागविली आहे.

निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेऊन ज्ञान संपादन करणाऱ्या आडगाव भू. येथील विद्यार्थी रंजना पोटींदे (७वी), गीतांजली खुरकुटे(५वी), हेमलता पोटींदे (५वी), कृष्णा बोरसे(६वी) आदी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने शाळेतील रिकामे तेलाचे डबे कापून त्यामध्ये एका बाजूला पाणी तर दुसऱ्या बाजूला दाणे टाकण्याची सुविधा केली.
शाळेच्या आवारात तसेच रस्त्यावरील झाडांवर हे कृत्रिम पाणवठे टांगण्यात आले असून ऐन उन्हात पक्षी या ठिकाणी पाणी पिऊन तृप्त होत आहेत. याकामी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक खैरणार, शिक्षक खिल्लारे, पुयड आदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी नियमितपणे या पाणवठ्यांवर दाणा-पाण्याची सोय करीत आहेत.
मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने झाडांची संख्या कमी झाली. ऊन्हाळ्यात पशू, पक्षी अन्नपाण्यावाचून भटकत असतात. सध्या कडक ऊन पडत असल्याने शिक्षकांच्या मदतीने जुन्या डब्यांचा वापर करून केलेले पाणवठे पक्ष्यांसाठी उपयोगी पडत आहेत.
-रंजना पोटींदे, विद्यार्थिनी.