स्कूलव्हॅनमधून पडून चिमुरड्याचा मृत्यू
By admin | Published: February 10, 2017 01:01 AM2017-02-10T01:01:16+5:302017-02-10T01:01:30+5:30
दुर्दैवी घटना : कोल्हे कुटुंबीयांवर आघात
नाशिक : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनातून खाली पडल्याने चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि़९) दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील यशवंत लॉन्ससमोर घडली़ मुकुंद प्रवीण कोल्हे (स्वामी समर्थनगर, यशवंत लॉन्ससमोर, नांदूर नाका) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे़ या दुर्दैवी घटनेमुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील लिटिल हर्ट्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुकुंद कोल्हे हा ज्युनियर केजीच्या वर्गात शिकत होता़ त्याच्या पालकांनी शाळेत ने-आण करण्यासाठी मॅक्सिमो (एमएच १५, इएफ ०५०२) वाहन लावलेले होते़ गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर वाहनचालक रज्जाक शेख हा मुलांना घरी सोडवत होता़ सर्व मुलांना घरी सोडल्यानंतर शेवटचा विद्यार्थी हा मुंकुद कोल्हे होता़ वाहनचालक शेख याने उर्वरित मुलांना घरी सोडल्यानंतर केवळ मुकुंदला घरी सोडणे बाकी
होते़ त्यातच घर अवघ्या पाचशे मीटरवर असल्याने मुकुंद दरवाजावर येऊन उभा राहिला होता़
त्यावेळी अचानक वाहनाचा दरवाजा उघडला गेला व चालू वाहनातून मुकुंद रस्त्यावरील खडीवर पडला़ यामध्ये त्यास जबर मार लागल्याने अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ या अपघात प्रकरणी आडगाव पोलिसांनी वाहनचालक रज्जाक शेख विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)