बाबळेश्वरमधील घटना : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:01 AM2020-06-17T00:01:39+5:302020-06-17T00:04:27+5:30
नाशिक : तालुक्यातील नाशिक -पुणे महामार्गावरील बाभळेश्वर गावातील रहिवाशी राजाराम शिंगाडे यांच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या तीन वर्षीय चिमुकलीला बिबट्याने ...
नाशिक : तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील बाभळेश्वर गावातील रहिवाशी राजाराम शिंगाडे यांच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या तीन वर्षीय चिमुकलीला बिबट्याने झडप घालून फरफटत ऊसाच्या शेतात नेल्याची घटना मंगळवारी (दि.१६) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. तासभर गावकऱ्यांनी ऊसशेती पिंजून काढल्यानंतर चिमुकलीचा मृतदेह शेतात आढळून आला. गुंजन दशरथ नेहरे (वय 3, रा. पिंंपळगाव ब.) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गुंजन ही आपल्या गर्भवती आईसह बाबळेश्वर या मामाच्या गावी आली होती. रविवारी आईची प्रसूती झाली व नेहेरे कुटुंबियांना कन्यारत्न प्राप्त झाले. आईसाठी दवाखान्यात रात्रीच्या जेवणाचा डबा घेऊन जाण्यासाठी गुंजन वडिलांसोबत शिंदे गावातून बाबळेश्वर येथील मामाच्या घरी आली. जेवण तयार होत असल्याने गुंजन घरातील अन्य लहान मुलांसोबत अंगणात खेळत होती. दरम्यान, घरापासून अगदी जवळच असलेल्या उसाच्या शेतातून बिबट्याने अचानकपणे गुंजनवर झडप घातली आणि अंगणापासून दोनशे ते अडीचशे मीटरपर्यंत गुंजनला फरफटत उसाच्या शेतात नेले असे प्रत्यक्षदर्शी मामा बबन शिंगाडे यांनी सांगितले. दरम्यान, ही घटना लक्षात येताच संपूर्ण बाबळेश्वर परिसरातील लोकवस्तीतील नागरिकांनी ऊसशेती पिंजून काढण्यास सुरुवात केली. चिमुकल्या गुंजनचा ऊसशेतीत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नाशिक पश्चिम वनविभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरी, राजेंद्र ठाकरे,उत्तम पाटील यांचे पथक अवघ्या काही वेळेतच घटनास्थळी पोहोचले.त्यांनी गावकऱ्यांना शांत करत बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे आश्वासन दिले दरम्यान,गावकऱ्यांनी बाबळेश्वर गावाच्या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.दोन दिवसांपूर्वीच दोनवाडे शिवारात बिबट्याने एका वृद्धाला ठार केले होते.ही घटना ताजी असतानाच त्या गावापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटरवर असलेल्या धारणा आणि गोदावरी खोऱ्याच्या बाबळेश्वर गावांमध्ये पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. वन विभागाच्या पथकाने मुलीचा मृतदेह तात्काळ ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. या घटनेने शिंगाडे व नेहरे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.संपूर्ण गावात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.