‘त्या’ चिमुकलीचा लागेना थांगपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:22+5:302021-02-15T04:14:22+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयात आपल्या गर्भवती बहिणीला प्रसूतीसाठी घेऊन आलेल्या दुसऱ्या महिलेच्या सव्वा वर्षाच्या चिमुकलीला एका अनोळखी पुरुषाने दुपारी बाकावर ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात आपल्या गर्भवती बहिणीला प्रसूतीसाठी घेऊन आलेल्या दुसऱ्या महिलेच्या सव्वा वर्षाच्या चिमुकलीला एका अनोळखी पुरुषाने दुपारी बाकावर झोपलेल्या अवस्थेत उचलून पोबारा केला. ही घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपहरणकर्त्या पुरुषाचा सरकारवाडा पोलिसांसह अन्य पोलीस ठाण्यांच्या गस्ती पथकांकडून तसेच गुन्हे शाखांच्या पथकांकडूनही शोध घेतला जात आहे; मात्र आतापर्यंत पोलिसांना यश आलेले नाही. उत्तर प्रदेशमधील एक कुटुंबीय ठाणे जिल्ह्यातील रबाले परिसरात मोलमजुरी करुन राहतात. या कुटुंबातील महिला तिच्या बहिणीच्या बाळंतपणासाठी नाशिकच्या अंबड भागात आली होती.
सीसीटीव्हीत चिमुकलीला खांद्यावर टाकून रुग्णालयातून घेऊन जात असलेल्या पुरुषाचा थांगपत्ता लावण्यासाठी पोलिसांनी बसस्थानकांवरील सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात संशयित परिसरातून जाताना दिसत आहे. तसेच पोलिसांनी अपहरणकर्त्यासह अपहृत बालिकेचे छायाचित्रासह त्याची सविस्तर माहिती टाकून भित्तीपत्रके तयार करुन ती शहरातील सर्वच वर्दळीच्या भागांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आली आहेत. दरम्यान, चिमुकलीच्या अपहरण प्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक नाहीद शेख हे करीत आहेत.
---इन्फो--
..तर तत्काळ साधावा संपर्क
अपहरणकर्त्याबाबत माहिती असल्यास तत्काळ जागरुक नागरिकांनी शहर पोलिसांच्या ०२५३-२३०५२३३ या नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी असे आवाहन शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. चिमुकली व अपहरण करणाऱ्या पुरुषाच्या शोधासाठी सरकारवाडा गुन्हे शोध पथकासह अतिरिक्त दोन पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखांच्या पथकांकडूनही समांतर तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
---इन्फो--
बस स्थानकांवरील सीसीटीव्ही बंद
ठक्कर बाजार येथील नवीन मध्यवर्ती बस स्थानक तसेच जुने मध्यवर्ती बस स्थानकांच्या आवारात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे केवळ शोभेपुरतेच राहिले आहे. येथील कॅमेरे मागील अनेक दिवसांपासून बंद पडलेले असल्याने पोलिसांच्या तपासामध्ये हाती येणारा सुगावाही हुकला. चिमुकलीला घेऊन अपहरण करणारा पुरुष या बसस्थानकांवर आला असेल आणि एखाद्या बसमध्ये बसून शहराबाहेर गेलाही असेल तरीही पोलिसांना त्याचा कुठलाही पुरावा बस स्थानकामधून मिळू शकणार नाही, कारण या बस स्थानकांवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे. कोरोना काळात बस सेेवा ठप्प होती तरीदेखील बस स्थानकांमधील भौतिक व मूलभूत सोयीसुविधांकडे लक्ष दिले गेले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
---
फोटो आर वर १४सिव्हिल/१४पोलीस नावाने सेव्ह