चिमुकल्यांचा सुट्टीचा मूड कायम : अभ्यासाचा पडला विसर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:30+5:302021-07-11T04:11:30+5:30
शासनाने पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन शाळा सुरू करण्याचे धोरण स्वीकारले असून, त्यामुळे जूनच्या दुसऱ्या ...
शासनाने पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन शाळा सुरू करण्याचे धोरण स्वीकारले असून, त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेत हजेरी लावून विद्यादानाचे काम सुरू केले आहे. मात्र, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कायम राहिला आहे. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे चिमुकल्यांना यंदाही शाळेच्या अभ्यासापासून सुट्टी मिळाली असून, बच्चे कंपनी शाळा नसल्याने आनंदात आहेत. ग्रामीण भागात ही परिस्थिती असली तरी, शहरी भागात मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विद्यार्थ्यांना अधूनमधून शिकविण्याचा प्रयोग केला जात आहे. परंतु, विद्यार्थ्यांना घरीच राहण्याची परवानगी असल्याने सकाळी लवकर उठून बस, रिक्षा पकडण्याची धावपळही टळली आहे.
----------
पालकांनी घरातच घ्यावी शाळा
* शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी सवय मोडू नये म्हणून पालकांनी घरातच विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याची वेळ आली आहे.
* गेल्या वर्षी मार्च महिन्यात शाळा बंद झाल्याने व वार्षिक परीक्षा होणार नसल्याने जून महिन्यापर्यंत विद्यार्थी निर्धास्त होते.
* यंदा मात्र ही जबाबदारी शाळांऐवजी पालकांवर येऊन पडल्याने अनेक पालक किंवा मोठे भाऊ, बहिणींकडून चिमुकल्यांना धडे गिरवावे लागत आहेत.
------------
गेल्या वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असले तरी त्यापेक्षाही कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळे एकीकडे भवितव्याचा प्रश्न व दुसरीकडे जिवाची भीती पाहता, मुलांना घरीच दिवसातून एक-दीड तास अभ्यासाचा सराव करून घेतला जातो.
- जगदीश वाघ, पालक
----------
शाळा नसली तरी मुलांचा शैक्षणिक नुकसानीचा विचार करून नियमित अभ्यासाची सवय मोडू नये म्हणून दुपारी व सायंकाळी त्यांच्याकडून सराव केला जात आहे. त्याचबरोबर इतर गुणही विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
- विजय देवरे, पालक
------------
अभ्यास टाळण्यासाठी कारणे अनेक
* शाळा नाही की शिक्षकांचा धाक नसल्याने मुलांकडून अभ्यास टाळण्याकडे कल अधिक आहे.
* अभ्यास नसल्याने मुले मोठ्या प्रमाणात खेळांकडे वळले आहेत. मैदानी असो की व्हिडिओ गेम खेळण्यास प्राधान्य दिले जात आहे.
* नवीन पुस्तके, शैक्षणिक साहित्य नसल्याचे कारणे सांगूनही अनेक मुले अभ्यास करण्यास नकार देत आहेत.
* पालकांकडे अभ्यास घेण्यासाठी वेळ असेल तेव्हाच झोप लागते असे सांगितले जाते.
* लहान मुले वर्षभरापासून घरी असल्यामुळे अभ्यासाचा त्यांना कंटाळा येऊ लागला आहे.
------------------
वर्गनिहाय विद्यार्थी
पहिली- ५४,७७४
दुसरी- ५७,४४९
तिसरी- ५७,६३६
चौथी- ६२,६४६