बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 01:23 AM2021-10-01T01:23:24+5:302021-10-01T01:24:28+5:30
वन्यजीव सप्ताहच्या पूर्वसंध्येला नाशिक वनपरिक्षेत्रातील गिरणारे गावापासून जवळच असलेल्या वाडगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालिकेला आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी (दि.३०) रात्री घराच्या पडवीबाहेर शिवन्या बाळू निंबेकर या मुलीवर बिबट्याने अचानकपणे झडप घेतली. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांनी तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
नाशिक : वन्यजीव सप्ताहच्या पूर्वसंध्येला नाशिक वनपरिक्षेत्रातील गिरणारे गावापासून जवळच असलेल्या वाडगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालिकेला आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी (दि.३०) रात्री घराच्या पडवीबाहेर शिवन्या बाळू निंबेकर या मुलीवर बिबट्याने अचानकपणे झडप घेतली. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांनी तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. गिरणारे वनपरिमंडळातील वाडगाव शिवारात निंबेकर यांच्या मळ्याजवळ असलेल्या घरातून पडवीत शिवन्या आली असता बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच कुटुंबीयांनी घराबाहेर धाव घेतली असता ती जखमी अवस्थेत आढळून आली. तत्काळ बालिकेला रुग्णालयात हलविले. मात्र, दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नाशिक पश्चिम वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. घटनास्थळालगत रात्रीच तत्काळ पिंजरा लावण्यात आला असून, रात्रभर या परिसरात वन कर्मचाऱ्यांच्या गस्ती पथकाकडून पेट्रोलिंग केली जात होती. वन विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, शासकीय नियमानुसार आर्थिक मदत कुटुंबीयांना दिली जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.