फाळके स्मारकात महापालिका भागीदारीत साकारणार चित्रनगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 01:40 AM2021-03-13T01:40:21+5:302021-03-13T01:40:45+5:30
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्वैभव मिळवून देतानाच तेथे चित्रनगरी साकरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला असून सोमवारी (दि.१५) स्वारस्य निविदा जारी होणार आहेत. पीपीपी तत्त्वावर खासगी भागीदारीत ही चित्रनगरी साकारणार आहे.
नाशिक : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्वैभव मिळवून देतानाच तेथे चित्रनगरी साकरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला असून सोमवारी (दि.१५) स्वारस्य निविदा जारी होणार आहेत. पीपीपी तत्त्वावर खासगी भागीदारीत ही चित्रनगरी साकारणार आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृती जतन करण्यासाठी महापालिकेने १९९९ मध्ये पांडवलेण्याच्या पायथ्याशी फाळके आणि बौद्ध स्मारक साकारले. निसर्गरम्य वातावरणात साकारलेले फाळके यांचे स्मारक हे पर्यटन स्थळ झाले. त्याठिकाणी चित्रनगरी सुरू करण्याची घोषणा त्यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी केली; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मात्र, आता महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर तसेच कैलास जाधव यांनीही हा विषय पटलावर घेतल्यानंतर त्याला गती मिळाली आहे. नितीन चंद्रकांत देसाई आणि तत्सम मान्यवरांशी बेालून त्यांच्या मार्गदर्शनाखाली फाळके स्मारकाचे रूपडे पालटवले जाणार आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेने आता तयारी सुरू केली असून पीपीपी म्हणजेच खासगी भागीदारीतून त्याचे रूपडे पालटवण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारी निविदा मागवण्यात येणार आहे.
मनपाला उत्पन्नही मिळणार
महापालिकेने स्वत: फाळके स्मारक चालवले होते. त्यावेळी सुरुवातीला उत्पन्न हे खर्चापेक्षा अधिक होते नंतर मात्र त्याची रया गेली. आता स्मारकाची देखभालदेखील करणे महापालिकेला अशक्य झाले आहे. त्यामुळे खासगी भांडवल गुंतवणुकीतून महापालिकेला उत्पन्नही मिळणार आहे.