राजधानी दिल्लीत झळकलेला साडेतीन शक्तिपीठांचा चित्ररथ वणीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 03:30 PM2023-03-15T15:30:56+5:302023-03-15T15:31:10+5:30
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्री शक्तीचा जागर यावर अधारित चित्ररथ होता
रितेश पारख
वणी (जि. नाशिक) : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित आलेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती हा चित्ररथ वणी येथे दाखल झाला आहे. या रथाचे विशेष सादरीकरण १६ मार्च रोजी वणी गावात तर १७ मार्च रोजी आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंग गडावर होत आहे. यापूर्वी कोल्हापूर, तुळजापूर व माहूर या तीन शक्तिपीठांत चित्ररथाचे सादरीकरण झाले. स्थानिक व भाविकांनी चित्ररथ आवर्जून पाहावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्री शक्तीचा जागर यावर अधारित चित्ररथ होता. डोळ्याचे पारणे फेडणारा हा प्रसंग टिपण्यासाठी वणीकरांसह भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, सर्व नागरिकांनी व भाविकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वणी येथे चित्ररथ समिती वणीचे दर्शन दायमा, किरण तिवारी, पीयुष भवर, भास्कर पाटील, चेतन कुन्हाडे, प्रशांत कड, बाळासाहेब घडवजे, मयुर जैन, सतीश जाधव, संतोष दुसाने, प्रमोद भांवेरे, मनोज थोरात, दिगंबर पाटोळे, आबा मोर आदी समिती सदस्य, सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद थोरात व विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी केले आहे.
जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा द्वितीय क्रमांक मिळाला. चित्ररथाचा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी दि. १६ सकाळी ९ वाजता वणी येथे खंडेराव मंदिर परिसरात होणार असून, श्री सप्तशृंगी मातेचे मूळ स्वरूप समजले जाणाऱ्या जगदंबा मातेच्या दरबारात चित्ररथ नेण्यात येणार आहे.