चिऊताईला शहरात हवा निवारा अन् मुबलक पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:15 AM2021-03-19T04:15:15+5:302021-03-19T04:15:15+5:30
नव्यानेे उदयास येणाऱ्या वसाहतींमध्ये चिमणी संवर्धनाकरिता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करायला हवेत. चिऊताईचे आपल्या वस्तीत स्वागताबाबत मागील दोन ते तीन ...
नव्यानेे उदयास येणाऱ्या वसाहतींमध्ये चिमणी संवर्धनाकरिता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करायला हवेत. चिऊताईचे आपल्या वस्तीत स्वागताबाबत मागील दोन ते तीन वर्षांमध्ये काहीशी मरगळ आलेली दिसते. गोदाकाठालगत काही भागांत काटेरी बाभळींची वृक्षराजी चिमण्यांचे संवर्धन करण्यास मोठा हातभार लावत आहे. अशा प्रकारची काटेरी झुडुपे, वृक्ष आजूबाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडांवरून वेगाने नाहीशी होऊ लागली आहेत. यामुळेही चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात सापडत आहे, हे लक्षात येत असल्याचे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे. शहरात मोठ्या संख्येने लोकवस्त्यांच्या मध्यभागी मनपाने मोकळे भूखंड राखीव ठेवलेले आहेत. या भूखंडांचा वापर चिमणीसंवर्धनाकरिता सहज करता येऊ शकतो, यासाठी परिसरातील नागरिकांनी पक्षीप्रेमींची मदत घेत, काटेरी झुडुपांची लागवड करत, पाणी मातीच्या भांड्यात भरून ठेवले तरी पुरेशे होईल. शहराच्या सभोवताली चिमण्यांची संख्या मागील काही वर्षांत जशी वाढलेली दिसत नाही, तशी ती कमीदेखील झाली नसल्याचे निरीक्षण नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी ऑफ नाशिकच्या पक्षीनिरीक्षकांनी नोंदविले आहे.
--इन्फो--
जणू चिऊताई रुसली की काय?
मनुष्यवस्तीजवळ पूर्वापार राहणारी चिऊताई एक प्रकारे मानवाचे उपद्रवी अळ्या, कीटकांपासून नेहमीच संरक्षण करत आली आहे. चिमण्यांचा थवा अंगणात वावरताना नजरेस पडणे हे मानवासाठी फायद्याचेच ठरते. मात्र, अलीकडे शहरी भागात बदललेली मानवी जीवनशैली अन् घरांच्या बांधकामशैलीमुळे चिऊताई जणू माणसांवरच रुसली की काय? असा प्रश्न पडतो.
---इन्फो--
दाट पर्णसंभाराच्या झाडांना पसंती
दाट पर्णसंभार असलेल्या प्रजातीची झाडे चिमण्यांना आकर्षित करतात. यामध्ये बकूळ, पुत्रंजिवा, आंबा, पारिजातक यासारखी झाडे लावून त्यांचे जतन करण्यावर भर देणे गरजेचे आहे, तसेच आपल्या आजूबाजूला असलेली बाभळीची झाडेही सुरक्षित कशी राहतील, यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, तरच भावी पिढीला चिऊताईची प्रत्यक्षरीत्या ओळख होईल.
--इन्फो---
घरटे ‘गिफ्ट’ देण्याचा सुरू व्हावा ‘ट्रेंड’
मनुष्यांच्या जवळ राहणारा चिमणी हा एकमेव पक्षी आहे. वास्तुशांती, वाढदिवसांसारखे कार्यक्रम साजरे करताना भेटवस्तू म्हणून चिऊताईसाठी कृत्रिम लाकडी घरटी देण्याचा नवा पायंडा नाशिककरांनी पाडायला हवा, असे पर्यावरणप्रेमी संस्थांचे मत आहे. चिमणीसंवर्धनाची चळवळ नाशकात सुरू होणे काळाची गरज आहे. यासाठी काही पर्यावणप्रेमी संस्थांनाही पुढाकार घ्यावा लागेल, हे निश्चित.
---कोट---
आतापर्यंत चिमणीपासूनच मनुष्याला निसर्गओळख होत आली आहे, हे विसरून चालणार नाही. किंबहुना पक्ष्यांविषयीचे प्रेम वाढीस लागण्यासाठीही चिमणीनेच अनेकांना प्रेरणा दिली आहे. निसर्गवाचनची सुरुवातच चिमणीपासून होते. पर्यावरणामध्येही या लहानशा पक्ष्याचे मोठे योगदान असून, चिऊताईसंवर्धनासाठी नाशिककरांनी दमदार प्रयत्न करायलाच हवेत.
-शेखर गायकवाड, पक्षीप्रेमी
---
फोटो आर वर१८चिमणी/१/२