चॉकलेटमुळे अनेक घरांमध्ये बालकांचे किडले दात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:19 AM2021-08-27T04:19:02+5:302021-08-27T04:19:02+5:30
नाशिक : कोणत्याही घरातील मूल रडले की त्याला चॉकलेट दिले जाते किंवा त्याला चॉकलेट घेण्यासाठी पैसे दिले जातात. ...
नाशिक : कोणत्याही घरातील मूल रडले की त्याला चॉकलेट दिले जाते किंवा त्याला चॉकलेट घेण्यासाठी पैसे दिले जातात. घरोघरी येणारे पाहुणे. आई-वडिलांचे मित्र, मैत्रिणीदेखील बाळासाठी अनेकदा चॉकलेट आणतात, मात्र या सगळ्याचा त्या घरातील मुलांच्या दातांवर परिणाम होत असतो. अशा प्रकारे अनेक मार्गांनी येणारे चॉकलेट हे मुलांच्या दातांवर अनेक प्रकारचे वाईट परिणाम करणारे ठरते.
चॉकलेट, मिठाई, कँन्डी, चिप्ससारखे पदार्थ दातात चिकटून राहतात, त्यातून किटाणू तयार होतात, ते ॲसिड तयार करतात, त्यामुळे दात किडून ही कीड दातांच्या नसांपर्यंत जाते. त्यातून अनेक प्रकारच्या दाताच्या व्याधींना प्रारंभ होतो. त्यामुळे दातदुखी, किडणे, नवीन दातही खराब होणे यासह रुटकॅनल करून कृत्रिम दात बसविण्यापर्यंतची वेळ बालकांवर येते. लहान वयात हेच सगळे खाल्ल्याने शहरातील अनेक मुलांच्या दातांचे रुटकॅनल करण्याची वेळ आली आहे. हे सगळं टाळणंही शक्य आहे. सतत चॉकलेट आणि गोड पदार्थ देणं टाळण्याची नितांत गरज आहे. येणाऱ्या पहिल्या दातापासूनच मुलांच्या दातांची काळजी घेतली, तर त्यांचे मौखिक आरोग्य कायमस्वरूपी राखणे शक्य होते. दुधाचे दात पडणारच मग कशाला एवढी काळजी घ्यायला हवी, असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. तेवढी लवकर तपासणी केल्यामुळे दातांमध्ये निर्माण होणारी पोकळी, दात किडणे याला प्रतिबंध करता येतो. या समस्यांमुळे मुलांना वेदना होतात, त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो आणि इतर वैद्यकीय समस्या निर्माण होतात. बाळाच्या दातांचे आरोग्य त्याला पहिला दात येण्याआधीपासूनच राखावे लागते. बाळाला चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत आणि तुमचे मूल मोठे होईपर्यंत म्हणजे अगदी माध्यमिकला जाईपर्यंत या सवयी टिकवून ठेवल्या पाहिजेत.
इन्फो
खानपानाच्या या सवयी घातक
गोड आणि चिकट पदार्थ मुलांच्या दातांसाठी अपायकारक असतात. त्यात कडक आणि मऊ कँडी, चॉकलेट, क्रीम बिस्किटे, क्रॅकर्स आणि वेफर्सचा समावेश होतो. पेन्सिल, पेन किंवा इतर वस्तू चावत राहणे
सतत गोड पदार्थ चघळणेदेखील दातांसाठी अयोग्य ठरते.
--------------
इन्फो
बाळांच्या दातांची नीगा
अगदी लहान बाळांच्या हिरड्या स्वच्छ ठेवणे, त्यांनी काही खाल्ले, दूध प्यायले की त्यांचे तोंड स्वच्छ ठेवणे यामुळे येणारे दात निरोगी येतील याची काळजी जाते. झोपताना दुधाची बाटली तोंडात ठेवून झोपायची सवय लागू देऊ नये. त्यामुळे बराच काळ दुधाचा अंश तोंडात राहून तेथे जंतूंची लागण होऊ शकते. लहान लहान दात यायला लागले की बाळांचे दात पालकांनी बोटाने किंवा बोटात घालायचा मऊ ब्रश मिळतो, त्या ब्रशच्या मदतीने साफ करावेत. काहीही खाऊ घातल्यावर किंवा दूध प्यायल्यावर हे करावे. त्यामुळे मुलांना अगदी नकळत्या वयापासून दातांच्या स्वच्छतेची सवय लावावी.
इन्फो
दुसऱ्या वर्षापासून सवय लावा
वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून मुलांना स्वतःच्या हाताने दात घासायला शिकवावे. सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपायच्या आधी दात घासलेच पाहिजेत असा नियम करावा. मुलांना दात घासायला उद्युक्त करण्यासाठी त्यांच्या आवडीचा ब्रश तसेच पेस्ट वापरू द्यावी. तसेच स्वतःदेखील मुलांच्या बरोबरीने दात घासून ते स्वच्छ ठेवावेत. मुले साधारण ८ ते १० वर्षांची होईपर्यंत त्यांच्या या सवयीकडे लक्ष द्यावे लागते. मग त्यांची त्यांना सवय लागून या गोष्टीचे महत्त्वदेखील लक्षात येते.