चॉकलेट डे’ला ‘ट्रॅडिशनल डे’ची साथ
By admin | Published: February 9, 2016 11:06 PM2016-02-09T23:06:42+5:302016-02-09T23:08:53+5:30
व्हॅलेंटाइन सप्ताह : गोडवा वाटून दृढ झाले स्रेहबंध
नाशिक : केटीएचएमसह शहरातील काही महाविद्यालयांमध्ये मंगळवारी ट्रॅडिशनल डेचे आयोजन करण्यात आले होते. व्हॅलेंटाइन सप्ताहाअंतर्गत चॉकलेट डे आणि व्हॅलेंटाइन डे एकत्रित साजरा करीत तरुणाईने विविध प्रकारे आनंद लुटला. एकमेकांना आवडीचे चॉकलेट्स वाटून मकरसंक्रांतीप्रमाणे या डे चे औचित्य साधत मैत्रीचे बंध दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रॅडिशनल डे असल्याने विद्यार्थ्यांनी राजस्थानी, गुजराती, पंजाबी, महाराष्ट्रीयन, पाश्चात्य अशा विविध प्रकारच्या वेशभूषा करून विविधतेतून एकतेचा संदेश दिला. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या वर्षातल्या लोकप्रिय व्यक्तीरेखांच्या वेशभूषा केल्या होत्या. त्यात साधू-संत, शकुंतला, नटसम्राट, पार्वती, काशीबाई, बाजीराव, बजरंगी भाईजान, नरेंद्र मोदी, जय मल्हार आदिंच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषा लक्षवेधक ठरल्या होत्या. व्हॅलेंटाइन डे बरोबरच चॉकलेट डे चेही आवर्जून सेलिब्रेशन करण्यात आले. आपल्या जीवलगांना त्यांच्या आवडत्या प्रकारच्या कॅडबरी, चॉकलेट देऊन गोडव्याची देवाण-घेवाण करण्यात आले. चॉकलेट डे निमित्त काही विद्यार्थ्यांनी चॉकलेटी रंगाचे पोषाख घालून महाविद्यालयात हजेरी लावत चॉकलेटी माहोल बनवून टाकला होता. (प्रतिनिधी)