टपालातून पोहोचले चॉकलेटस् आणि ड्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:55+5:302021-08-25T04:19:55+5:30
भाऊ-बहिणींच्या गोड नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिणी आपल्या भावाला आवर्जून राखी बांधते; मात्र घरापासून दूर देश-परदेशात असलेल्या ...
भाऊ-बहिणींच्या गोड नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिणी आपल्या भावाला आवर्जून राखी बांधते; मात्र घरापासून दूर देश-परदेशात असलेल्या भावापर्यंत पोहोचणे शक्य नसले तरी बहिणींच्या भावना राखीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. टपाल हे मध्यस्थ माध्यम ठरले असून, बहीण-भावाच्या नात्याचा सेतू बनलेल्या टपालातून भावानेदेखील बहिणींसाठी भेटवस्तू पाठविल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून टपालाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या भेटवस्तू नाशिक मुख्य टपाल कार्यालयातून बटवडा केला जात आहे. युके, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, तसेच दुबई, कॅनडा या देशांमधून भावांनी आपल्या बहिणींसाठी भेटवस्तू धाडल्या आहेत. स्पीड पोस्ट आणि रजिस्टर पोस्टाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या भेटवस्तू पाठविण्याची व्यवस्था असल्यामुळे टपाल खात्याने यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.