खासगी भागीदारीद्वारे घरकुल निर्मितीला पसंती
By admin | Published: June 6, 2017 03:38 AM2017-06-06T03:38:15+5:302017-06-06T03:38:26+5:30
नाशिक : महापालिकेने राबविलेल्या झोपडपट्टीनिहाय व मागणी सर्वेक्षणात ७५ कुटुंब घरकुलांच्या माध्यमातून राहणीमान सुधारण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेने राबविलेल्या झोपडपट्टीनिहाय व मागणी सर्वेक्षणात तब्बल ७५ कुटुंब घरकुलांच्या माध्यमातून आपले राहणीमान सुधारण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले आहे. मागणी सर्वेक्षणात तीन घटकांमध्ये २९ हजार ९९१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यात सर्वाधिक १९,२३८ इच्छुक लाभार्थ्यांनी खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीस पसंती दर्शविली आहे. झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षणात तब्बल ४४ हजार ७८४ लाभार्थ्यांना घरकुलांची प्रतीक्षा आहे.
महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३१ मे पर्यंत मागणी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. त्यात सहाही विभागीय कार्यालयांमार्फत वेगवेगळ्या तीन घटकांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यासाठी सहाही विभागातून ७२५३, खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी १९ हजार २३८ तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यासाठी अनुदानाकरिता ३ हजार ५०० लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत.