चॉपरने वार करुन युवकाचा खून; महालक्ष्मी चाळीत सशस्त्र धुमश्चक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:20 PM2021-02-09T13:20:43+5:302021-02-09T13:25:41+5:30
महालक्ष्मी चाळीत सशस्त्र धुमश्चक्री उडाल्याची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. दंगलखोरांपैकी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली.
नाशिक : जुने नाशिक परिसरातील वडाळानाका द्वारकेजवळील महालक्ष्मी चाळीमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दंगल उसळली. यावेळी दंगलखोरांच्या परस्परविरोधी गटांनी एकमेकांवर चॉपर, धारधार सुरा, चाकूसारख्या शस्त्रांनी हल्ला चढविला. यावेळी आकाश संतोष रंजवे (२६) या युवकाला चॉपरचा वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच ठार झाला तर करण लोट या युवकावरही दंगलखोरांनी शस्त्रांनी हल्ला चढवून गंभीररित्या जखमी केले असून त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पाच ते सहा संशयित दंगलखोरांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुने नाशिक परिसरात द्वारका व बागवानपुरा या परिसरांच्या मध्यभागी असलेल्या महात्मा फुले पुतळ्याजवळ असलेल्या पोलीस चौकीला लागून महालक्ष्मी चाळ ही वसाहत आहे. या वसाहतीत कामगार वर्ग वास्तव्यास आहे. सोमवारी मध्यरात्री अचानकपणे दोन गट आपआपसांत भिडले. 'तु मेरी पुलीस को टिप क्यु देता हैं' असा जाब विचारत संशयित विशाल बेनवाल व त्याच्या साथीदारांनी आकाश व करण लोट यांना शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित बेनवालसह सतीश टाक, पवन टाक, आकाश टाक, निखिल टाक, अभय बेनवाल, हरिष पवार, मनीष दुलगज, शिवम पवार आदींनी येऊन शिवीगाळ करत धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. यावेळी रंजवे यास वर्मी घाव लागल्याने त्याचा मृत्यु झाला तर करण हा गंभीरपणे जखमी झाला. महालक्ष्मी चाळीत सशस्त्र धुमश्चक्री उडाल्याची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. दंगलखोरांपैकी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या दंगलखोरांवर खुन, प्राणघातक हल्ला व दंगल माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दंगलीमध्ये सुमारे दहा ते बारा संशयितांचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. फरार समाजकंटकांचा पोलीस शोध घेत आहेत.