नाताळ सणानिमित्त सजली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:39 PM2018-12-16T22:39:07+5:302018-12-17T00:23:18+5:30
नाताळचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेतील दुकाने नाताळनिमित्त सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक वस्तुंनी जणू काही सजली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, आकाश दिवे सर्वांचेच आकर्षण ठरत आहे.
मानसी खैरनार । नाशिक : नाताळचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेतील दुकाने नाताळनिमित्त सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक वस्तुंनी जणू काही सजली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, आकाश दिवे सर्वांचेच आकर्षण ठरत आहे.
नाताळ सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली असून, शहरातील अनेक भागांतील दुकानात नाताळासाठी आवश्यक वस्तूंची आकर्षक पद्धतीने मांडणी केलेली आहे. लहान आणि मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लॉजचे शर्ट, शुभेच्छापत्रे, सांताक्लॉजची टोपी, कपडे, चॉकलेट््स, कॅडबरी, सजावटीचे साहित्य अशा विविध वस्तू बाजापेठात उपलब्ध आहेत.
बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या रेडिमेड दृश्यांना खरेदी करण्याचे बरेच प्राधान्य मिळत आहे. विशेषत: रंगीबेरंगी मेणबत्त्या आणि डिझायनर जिंगल बेल्सला अधिक मागणी आहे. तसेच विविध प्रकारचे गिफ्टबॉक्सही उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे शहरात रस्त्याच्या कडेला सांताक्लॉज कॅप्सची विक्री करणारे विक्रेते दिसून येत आहेत. दहीपूल, महात्मा गांधीरोड आणि कॉलेजरोड परिसरातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असून, खरेदीचा उत्साह दिसत आहे. येशु ख्रिस्ताच्या जन्माच्या तयारीसाठी संत आंद्रिया चर्चमध्ये लगबग दिसत आहे. तसेच रोषणाईसह सजावटीची व येशु जन्माच्या देखाव्याची तयारी करण्यात सुरुवात झाली आहे. शहरातील विविध चर्चमध्ये कार्यक्रमांचे, प्रार्थनेचे आयोजन करण्याचे आयोजन केले जात आहेत. ख्रिस्ती समाजबांधवांमध्ये नाताळाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नाताळानिमित्त साजरा होणाºया सर्व कार्यक्रमांची यादी संपूर्ण तयार झाली असून, शाळेतील मुलांमध्ये ख्रिसमससाठी मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. सर्व विद्यार्थी येशु जन्माची गाणी गाण्यासाठी तयारीदेखील करताना आढळून येत सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. संगीताचा कार्यक्रम, नाट्यस्पर्धा, आॅर्केस्ट्रा आदी कार्यक्रम होणार आहे.
तरुणाईमध्ये उत्साह
नाताळ सणाला एक आठवडा बाकी असतानाच ख्रिस्ती समाजाने उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलांमध्ये तसेच तरुणाईमध्ये उत्साह जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
चर्चच्या आवारात आकर्षक सजावट
संत आंद्रिया चर्चमध्ये ख्रिसमस स्टार बनविण्यासाठी यावर्षी नवीन संकल्पना करण्यात येणार आहे. ज्यामध्ये डिजिटल स्टाइलमध्ये येशू जन्माचे दृष्य दिसेल. तसेच येशुख्रिस्त जन्माचा देखावा करण्याची तयारी दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सुरू आहे. चर्चच्या आवारात आकर्षक झोपडी उभारण्यात येत आहे.