ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने बाधीत चक्क महापालिकेच्या मुख्यालयात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:16 AM2021-04-01T04:16:14+5:302021-04-01T04:16:14+5:30
ऑक्सीजन बेडस मिळत नसल्याने त्याने ऑक्सिजन सिलींडर घेऊन बुधवारी (दि. ३१) थेट महापालिकेचे रूग्णालयाच गाठले. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ ...
ऑक्सीजन बेडस मिळत नसल्याने त्याने ऑक्सिजन सिलींडर घेऊन बुधवारी (दि. ३१) थेट महापालिकेचे रूग्णालयाच गाठले. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. अखेरीस महापालिकेने रूग्णवाहिका पाठवून या देान्ही रूग्णांना नाशिकरोड येथील आपल्या रूग्णालयात दाखल केले आणि साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
शहरात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सक्रीय रूग्ण संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे रूग्णालयात बेडस विशेषत: ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर बेड आढळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील सिडकोतील कामटवाडे भागातील एका नागरीकाचा कोरोना चाचणी अहवाल तीन दिवसांपूर्वी पॉझीटीव्ह आला. त्यानंतर खासगी रूग्णालयात बेडस मिळाले नाहीच शिवाय ऑक्सीजन लेव्हल कमी झाली. त्याच्या कुटूंबीयांच्या म्हणण्यानुसार ३६ इतकी ऑक्सीजन लेव्हल झाली. दुसऱ्याही एका बाधीताला मनपा रूग्णालयात जागा मिळत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अखेरीस येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्या मदतीने या रूग्णांच्या नातेवाईकांनी नाशिक महापालिका आणि जिल्हा शासकीय रूग्णालयाशी संपर्क साधला मात्र बेडस उपलब्ध झाले नाही. खासगी रूग्णालयात परवडत नाही आणि मनपा रूग्णालयात बेडस शिल्लक नाही अशी अवसथा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आणि गटनेते विलास शिंदे यांनी देखील यावेळी मनपा प्रशासनाच्या कारभारावर टीका केली.
दरम्यान, महापालिकेच्य अधिकाऱ्यांपर्यंत हा प्रकार गेल्यानंतर त्यांनी बिटको रूग्णालयात दाखल करा असे सांगितले. मात्र, रूग्णवाहीकाच नसल्याचे सांगितल्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी महापालिकेची रूग्णवाहीका पाठवून दोन्ही बाधीतांना नाशिकरोड येथील बिटको रूग्णालयात दाखल केले.
इन्फो....
आंदेालन अंगाशी गुन्हा दाखल करण्याची तयारी
ऑक्सीजन बेड मिळत नसल्याची काहीही तक्रार असली तरी थेट कोरोना बाधीत रूग्णांना महापालिकेच्या प्रवेशव्दारावर आणल्यानंतर प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली. हे असेच सुरू राहीले तर एक पायंडा पडेल,शिवाय अन्य कर्मचारी आणि अभ्यागत बाधीत झाले असते तर जबादारी केाणी घेतली असती असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दरम्यान पोलीसांनी दीपक डोके यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली असून डाेके यांनीही त्यास दुजोरा दिला.