सादरे आत्महत्त्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा
By admin | Published: October 20, 2015 10:07 PM2015-10-20T22:07:28+5:302015-10-20T22:09:39+5:30
विखे-पाटील : एकनाथ खडसे यांच्यावर टीका
लासलगाव : कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खात्याचीही जबाबदारी असल्याने त्यांचे वाळू प्रश्नाकडे जास्तच लक्ष असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. निलंबित पोलीस निरीक्षक आत्महत्त्या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीची मागणीही त्यांनी यावेळी केली.
विखे-पाटील मंगळवारी निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथे खासगी दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सदर टीका केली. जळगावच्या पोलीस अधीक्षकांच्या दबावाने निरीक्षक अशोक सादरे यांचे निलंबन झाले. त्यामुळे सादरे यांनी नाशिक येथे राहत्या घरी आत्महत्त्या केल्याची घटना घडली.
वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महसूलमंत्री यांचा वाळूमाफियांना पाठिंबा असल्याने सदर घटना घडल्याचा आरोप करीत विखे-पाटील यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली.
पालकमंत्री गिरिश महाजन यांनी मराठवाडा व नाशिक, अहमदनगर पाण्याचा वाद निर्माण केल्याचा आरोप करत विखे-पाटील यांनी धरणातील पाणीसाठा मर्यादित असतांना बनावट आकडेवारीचा आधार घेऊन नाशिक व नगरचे पाणी पळविले जात असल्याचे सांगितले. (वार्ताहर)