सादरे आत्महत्त्येचा तपास सीआयडीकडे
By admin | Published: October 29, 2015 10:24 PM2015-10-29T22:24:38+5:302015-10-29T22:28:51+5:30
कागदपत्रांचा अभाव : आज सुनावणी
नाशिक : पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणात थेट पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने या गुन्ह्याचा योग्य तपास होण्याविषयी सादरे कुटुंबीयांकडून व्यक्त होणारा संशय पाहता राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या साऱ्या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे सोपविला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित सागर चौधरी याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, दि. ३० रोजी सुनावणी होणार असून, त्यानंतरच गुन्ह्याची कागदपत्रे सीआयडीकडे सोपविण्यात येणार आहेत.
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रायते व वाळू ठेकेदार सागर चौधरी या तिघांविरुद्ध येथील पंचवटी पोलीस ठाण्यात सादरे यांना आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. (पान ९ वर)
या गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा संबंध असल्यामुळे पोलीस प्रकरण दडपण्याची तक्रार सादरे यांच्या पत्नीने जाहीरपणे केली होती. त्याची दखल घेऊन राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सदर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय घेऊन तसे आदेश काढले आहेत. स्थानिक पातळीवर गुरुवारी सकाळी आदेश मिळताच, सदर गुन्ह्याच्या कागदपत्रासाठी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांना पत्र देऊन मागणी केली, परंतु या गुन्ह्यातील अन्य संशयित सागर चौधरी याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने गुन्ह्याचे कागदपत्रे न्यायालयाने ठेवून घेतले आहेत. शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रे सीआयडीकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचे उप अधीक्षक के. डी. पाटील करणार आहेत.
एका स्तरावरील चौकशी पूर्ण
अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपासाबाबत दोन स्तरावर चौकशी सुरू होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंग यांच्याकडे विभागीय चौकशी होती; ती आता पूर्ण झाली असून त्याचा अहवाल पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला आहे. तर नाशिकचे आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यामार्फत दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू आहे.
अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.
प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक