सिडको, अंबडला काेरोना निर्बंधांचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:13 AM2021-04-10T04:13:48+5:302021-04-10T04:13:48+5:30
दाट लोकवस्ती असलेल्या सिडको तसेच अंबड भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरली ...
दाट लोकवस्ती असलेल्या सिडको तसेच अंबड भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महापालिका व अंबड पोलीस प्रशासनाच्या वतीने भाजी बाजाराच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना केल्या होत्या. परंतु त्यादेखील फोल ठरल्या. शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू केले खरे, परंतु प्रत्यक्षात सिडको भागात प्रत्येक गल्लीबोळात ‘आगे दुकान पिछे मकान’ अशी परिस्थिती असल्याने कितीही कडकडीत बंद केले असले तरी सिडकोतील दुकाने मात्र सकाळपासूनच बऱ्यापैकी उघडी राहात आहेत. भाजी बाजार, किराणा दुकान याचबरोबर इतर खाद्यपदार्थ या दुकानात सकाळपासूनच गर्दी होऊ लागली असून, त्यामुळे कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना कागदावरच असल्याचे दिसू लागले आहे. अनेक दुकानदारांनी घरातूनच व्यवसाय सुरू केला असल्यामुळे कारवाईपासून बचावत आहेत.
चौकट===
आगे दुकान पिछे मकान असलेल्या सिडको भागातील बहुतांश नागरिकांनी त्यांच्या घराच्या पुढच्या बाजूला दुकान टाकले आहे. त्या दुकानाच्या मागील बाजूस वास्तव्य करतात. यामुळे दुकानदारी बंद करा, असे सांगितले असले तरी त्यांच्या घरात जाण्याचा रस्ता एकच असल्यामुळे नागरिक दुकानाचे शटर अर्धे खाली करून कडकडीत बंद असतानाही व्यवसाय करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
(फोटो ०९ सिडको)