सिडको विभागात महापालिकेचे सफाई कर्मचारी झाले ‘सह्याजीराव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:07 AM2017-11-27T00:07:12+5:302017-11-27T00:10:55+5:30
महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागात स्वच्छतेसाठी अगोदरच अत्यंत कमी कर्मचारी असताना याच विभागातील काही सफाई कर्मचारी हे सकाळी कामाच्या वेळेस हजर राहून हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करतात व यानंतर मात्र काम न करताच घरी जातात व पुन्हा कामकाजाची वेळ संपण्याच्या वेळी येऊन पुन्हा हजेरी लावत असल्याचा धक्कादायक प्रकार सिडको विभागात घडत आहे.
नरेंद्र दंडगव्हाळ ।
सिडको : महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागात स्वच्छतेसाठी अगोदरच अत्यंत कमी कर्मचारी असताना याच विभागातील काही सफाई कर्मचारी हे सकाळी कामाच्या वेळेस हजर राहून हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करतात व यानंतर मात्र काम न करताच घरी जातात व पुन्हा कामकाजाची वेळ संपण्याच्या वेळी येऊन पुन्हा हजेरी लावत असल्याचा धक्कादायक प्रकार सिडको विभागात घडत आहे. काही कर्मचारी महिन्यातील पंधरा-पंधरा दिवस कामावर हजर न राहता त्यांच्या स्वाक्षºया परस्पर घेतल्या जात असून, त्यांना संपूर्ण महिन्याचा पगार मिळत आहे. यात अधिकारी व कर्मचाºयांमध्ये आर्थिक तडजोडदेखील होत असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात डेंग्यूसदृश तसेच साथीचे आजार असलेल्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य विभाग चांगलाच गाजत आहे. आरोग्य विभाग दुसरीकडून बदलून आलेल्या कामगारांना सफाई कामगार म्हणून रुजू करून घेतले जाते; परंतु त्यांना आरोग्य विभागात काम न देता घरपट्टी, जन्म-मृत्यू किंवा इतर विभागात सोयीचे काम देण्यात येत असल्याने सफाई कोणी करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. मुळात आरोग्य विभागात कामगारांची संख्या कमी असल्याने त्यांना याच विभागात काम करण्याची गरज असताना केवळ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रशासन अशा कर्मचाºयांवर मेहेरबान होत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिडकोतील तुळजाभवानी चौक व परिसरात शंभराहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे उघडकीस आले असून, तुळजाभवानी चौकापाठोपाठ संपूर्ण सिडको भागातच साथीच्या आजाराने अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. अशी भयंकर परिस्थिती असताना लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सिडको विभागाच्या स्वच्छतेची जबाबदारी अवघ्या ११० सफाई कामगारांवर सोपविण्यात आली आहे. यातच आहे ते कर्मचारीदेखील नियमित कामावर येत नसल्याने स्वच्छतेची जबाबदारी कमी कर्मचाºयांवर येत असल्याने त्यांना कामाचा अधिक भार पेलावा लागत आहे. आरोग्य विभागात सफाई कर्मचारी कमी असताना आहे ते कर्मचारीदेखील नियमित कामावर हजर राहात नसल्याचे दिसून येत आहे. हजेरी मस्टरवर संख्या अधिक दिसत असली तरी प्रत्यक्षात कामावर मात्र कमी कर्मचारी असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिडकोसह परिसरात डेंग्यू व साथीच्या आजाराने डोके वर काढले होते. परंतु यानंतरही कर्मचारी संख्या वाढविण्यात आलेली तर नाही; परंतु मनपाच्या इतर विभागातून सफाई कामगार म्हणून बदली होऊन आलेल्या कामगारांनादेखील आरोग्य विभागात काम न देता इतर दुसºया विभागात काम करण्यासाठी अधिकाºयांकडूनच सांगण्यात येत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिडको विभागात कर्मचारी कमी असून, त्या तुलनेत कामे अधिक आहेत. याबाबत नगरसेवकांनी अनेकवेळा कर्मचाºयांची संख्या वाढविण्याबाबत आवाज उठविला आहे. काही दिवसांपूवी महापौरांनी सिडको प्रभागात घेतलेल्या बैठकीत कर्मचारी संख्या वाढविण्याबाबत सांगितले होते. परंतु अद्यापही कर्मचारी संख्या वाढविण्यात आलेली नाही. यातच सिडको विभागातील काही सफाई कर्मचारी हे महिन्यातील पंधरा दिवस कामावर आले नाही तरी त्यांची हजेरी लावण्यात येत असून, यात कर्मचारी व संबंधित अधिकारी यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण होते.