सिडकोत आत्तापर्यंत सर्वाधिक रुग्ण, मात्र पंचवटीच हॉटस्पॉट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:18+5:302021-05-16T04:14:18+5:30
कोरोनाचे संकट गेल्या वर्षी आल्यानंतर गोविंदनगर भागात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर शहराच्या विविध भागांत रुग्ण आढळले असले तरी ...
कोरोनाचे संकट गेल्या वर्षी आल्यानंतर गोविंदनगर भागात पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर शहराच्या विविध भागांत रुग्ण आढळले असले तरी वडाळागाव हॉटस्पॉट झाला होता. त्यामुळे संपूर्ण वडाळागाव सील करण्याची वेळ आली हेाती. त्या पाठोपाठ पंचवटीतील पेठरोड भागातील दहा ते बारा झोपडपट्ट्यांमध्ये कोरेाना संसर्ग शिरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे महापालिकेने ज्याप्रमाणे वडाळागाव सील केले त्या प्रमाणे पेठरोड सील करणे शक्य नव्हते. कारण येथील झोपडपट्टीत तसेच विविध नगरांमध्ये जाण्यासाठी इतके मार्ग आहेत की, ते सील करणे शक्यच नव्हते. नंतर जुने नाशिक, सातपूर अंबड लिंकरोड, लेखानगर परिसर असे अनेक भाग हॉटस्पॉट तयार झाले होते. त्यामुळे कोरोना लाटेत पंचवटीचा अव्वल क्रमांक जाऊन नंतर सिडकोचा पहिला क्रमांक आला.
गेल्या वर्षभरात सिडकोत ५१ हजार ८७२ रुग्ण आढळले आहेत, तर पंचवटीत ४७ हजार ६५५ बाधित आढळले आहेत. नाशिकरोड विभागही कधी काळी हॉट स्पॉट होता मात्र, या विभागात ३७,३६३ रुग्ण आढळले आहेत.
महापालिकेच्या सहाही विभागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या बघितली पूर्व, पश्चिम आणि सिडको या विभागात अन्य तीन विभागांच्या तुलनेत कमी रुग्ण आहेत. पूर्व विभागात २८ हजार २८७, पश्चीम विभागात २३ हजार २१, तर सातपूूर विभागात १७ हजार ९८७ रुग्ण आत्तापर्यंत आढळले आहेत.
गेल्या दहा दिवसांतील रुग्णसंख्येचा आढावा घेतला, तर पंचवटीत चार हजार ५०४ बाधित आढळले आहे, तर दुसरीकडे सिडकोत ३ हजार ४४८ रुग्ण आढळले आहेत. नाशिकरोडमध्ये २ हजार ९७२, तर पूर्वमध्ये १ हजार ६८४, पश्चिममध्ये १ हजार ५८५ तसेच १ हजार ३९३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी एप्रिलपासून आत्तापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित सिडकोत आढळले असले तरी सध्याच्या स्थितीत गेल्या दहा दिवसांत पंचवटीच हॉटस्पॉट असल्याचे दिसत आहे.
इन्फो...
पंचवटी-सिडकोच हॉटस्पॉट का?
१ सर्वाधिक लोकसंख्या सिडको आणि त्या पाठोपाठ पंचवटीत आहे. त्याचप्रमाणे सर्वाधिक संपर्क क्षेत्राचे ठिकाणदेखील हे दोन विभागच आहेत.
२ पंचवटीत कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई, गुजरातसह अन्य अनेक राज्यात भाजीपाला पाठविला जातो. व्यापारी आणि कामगार या भागांच्या संपर्कात असतात.
३ सिडकोतदेखील उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच दाट लोकवस्ती, त्यामुळे छोट्या घरांमध्ये अनेक कुटुंब सदस्य असतात.
कोट...
सिडको आणि पंचवटी दोन्ही सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरातील विभाग आहेत. तसेच संपर्काबरोबरच दाटवस्तीदेखील आहे. अर्थात याच दोन विभागात अधिक रुग्ण काय आहेत, याचे शास्त्रोक्त विश्लेषण करावे लागेल.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
-------
(श्री. ईश्वर ग्राफ करीत आहेत.)