सिडकोमध्ये पेट्रोल पंपावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:49 AM2017-07-25T00:49:52+5:302017-07-25T00:50:12+5:30
सिडको : ठाणे गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिडको परिसरातील दत्तमंदिर स्टॉपजवळील एचपी कंपनीच्या विशाल पेट्रोपंपावर पोलिसांनी छापा टाकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : ठाणे गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिडको परिसरातील दत्तमंदिर स्टॉपजवळील एचपी कंपनीच्या विशाल पेट्रोपंपावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना काही आक्षेपार्ह आढळून आले नाही; मात्र संशयास्पद दोन पल्सर कार्ड तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडकोमधील सदर पेट्रोल पंपावर प्रमाणापेक्षा कमी पेट्रोल ग्राहकांना मिळत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार नागपूर, पुणे, रायगड, मुंबई व नाशिक शहरांत पेट्रोल पंप तपासणी माहिमेअंतर्गत या पंपाची संशयास्पद म्हणून तपासणी करण्यात आली. येथील सर्व युनिटची तपासणी पथकाने केली. यावेळी दोन युनिटमध्ये असलेल्या पल्सर कार्डमध्ये काहीतरी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी सदर कार्ड जप्त केले आहे. गुन्हा दाखल करून कारवाई करण्यासारखा गंभीर प्रकार आढळून आला नाही किंबहूना तसे पुरावे आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पल्सर कार्डच्या पडताळणीत छेडछाड उघड झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिमसेबल उणे १५ किंवा त्यापेक्षा कमी आढळून आले. या कारवाई दरम्यान कंपनीचे विक्री विभागाचे व्यवस्थापकही हजर होते.
१५ पेट्रोल पंप रडारवर
शहरातील दहा ते बारा पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली असून, काही संशयास्पद पेट्रोल पंपावरील पल्सर कार्ड पडताळणीसाठी कंपनीकडे पाठविण्यात आले आहे. याबाबत अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी सांगितले. कारवाई सुरूच राहणार असून, शहर व परिसरातील बहुतांश पेट्रोल पंपांबाबत तक्रारी असून, एकूण १५ पेट्रोल पंप रडारवर असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.