सिडको-सातपूर परिसर ‘डेंजर झोन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:12 AM2017-10-31T00:12:20+5:302017-10-31T00:15:54+5:30
घराघरांमध्ये साठविलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येत असल्याने सिडको-सातपूर परिसर डेंग्यूच्या दृष्टीने ‘डेंजर झोन’ ठरला असून, महापालिकेच्या पथकांमार्फत घरोघरी जाऊन मोहीम राबवत डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत.
नाशिक : घराघरांमध्ये साठविलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येत असल्याने सिडको-सातपूर परिसर डेंग्यूच्या दृष्टीने ‘डेंजर झोन’ ठरला असून, महापालिकेच्या पथकांमार्फत घरोघरी जाऊन मोहीम राबवत डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत. चार दिवसांपूर्वी सिडकोतील तुळजाभवानी चौक परिसरात ५० हून अधिक डेंग्यूच्या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे महापालिकेच्या पथकांसह जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचाºयांनी सदर परिसरात घरोघरी तपासणी मोहीम हाती घेतली. त्यात ४८२ घरांना भेटी देऊन ५६५ पाण्याचे साठे तपासले असता ११ ठिकाणी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या होत्या. परंतु, रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन महापालिकेच्या पथकाने सोमवारी (दि.३०) मोहीम पुढे चालू ठेवली असता, तुळजाभवानी चौक परिसरातच सुरू असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी वरच्या मजल्यावर साठविलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. सदर बांधकाम हे दिवाळीच्या सुटीत बंद ठेवण्यात आले होते. परंतु, वरच्या मजल्यावर पाण्याचा ड्रम तसाच पडून होता. याच ड्रममध्ये साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांचे उत्पत्तीस्थळ आढळून आले. याशिवाय, एका घराच्या छतावर भंगार मालाच्या ठिकाणी तसेच घरातील माळ्यावर ठेवण्यात आलेल्या सिंटेक्सच्या टाकीत डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. सिडको व सातपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची लागण झालेले रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने महापालिकेने या भागाकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. सिडको-सातपूर पाठोपाठ पंचवटी व नाशिकरोड भागात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येत आहेत.
फ्रीजच्या ट्रेमध्ये अळ्या
महापालिकेच्या पथकामार्फत घरोघरी तपासणी मोहीम राबविली जात असून, त्यात प्रामुख्याने, फ्रीजच्या पाठीमागे असलेल्या ट्रेमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येत आहेत. महापालिकेकडे अपुरा कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन तपासणी करणे शक्य होत नाही. त्यासाठीच नागरिकांनी स्वत:हून साठविलेल्या पाण्याबाबत काळजी घ्यावी आणि डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्यास सदर पाणीसाठे नष्ट करावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.