सिडकोला आता दोन धरणांमधून पाणी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:11 AM2020-12-09T04:11:18+5:302020-12-09T04:11:18+5:30
पाथर्डी येथील जलकुंभातून इंदिरानगर आणि सिडको विभागासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे आदेश महापौरांनी दिले आहे. सिडकोच्या काही प्रभागांमध्ये गेल्या चार ...
पाथर्डी येथील जलकुंभातून इंदिरानगर आणि सिडको विभागासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे आदेश महापौरांनी दिले आहे.
सिडकोच्या काही प्रभागांमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्यास पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता रवींद्र धारणकर आणि गोकूळ पगारे यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचा आराेप सिडकोतील नगरसेवकांनी सोमवारी (दि.७) झालेल्या महासभेत केला होता. या नगरसेवकांनी ऑनलाइन महासभा असतानाही महापौरांच्या पीठासनसमोर जाऊन रोष व्यक्त केल्याने महापौरांनी मंगळवारी (दि.८) तातडीने या विषयावर बैठक बोलवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सकाळी ही ‘रामायण’ या महापौर निवासस्थानी पार पडली. यावेळी सभागृहनेेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, अविनाश धनाईत, रवींद्र धारणकर, ललित भावसार तसेच इंदिरानगर व सिडको विभागातील नगरसेवक उपस्थित होते.
मुकणे योजनेतून सिडकोच नव्हे, तर पंचवटी आणि नाशिकरोडपर्यंत पाणीपुरवठा केला जात असल्याने सिडकोतील पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचा निष्कर्ष काढत सिडको भागाला परिसराला मुकणेबरोबरच काही प्रमाणात गंगापूर धरणातूनही पाणीपुरवठा करण्याचे आदेश महापौरांनी दिला. उपअभियंता रवींद्र धारणकर आणि ललित भावसार यांच्यावर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी महापौरांनी सोपविली.
तत्पूर्वी बैठक सुरू झाल्यानंतर दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. केवळ पाणीपुरवठा विभागाचे सदोष नियोजनच पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास कारणीभूत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. या बैठकीस पूर्व विभागाचे सभापती ॲड. श्याम बडोदे, सिडकोचे सभापती चंद्रकांत खाडे, नगरसेविका दीपाली कुलकर्णी, रत्नमाला राणे, राकेश दोंदे, भगवान दोंदे, डी. जी. सूर्यवंशी, किरण गामणे, मुकेश शहाणे, छाया देवांग, प्रतिभा पवार, पुष्पा आव्हाड, सुदाम डेमसे, दीपक दातीर आदी उपस्थित होते.
इन्फो...
यापूर्वी सिडको विभागाला गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मुकणे योजना सुरू झाल्यानंतर गंगापूर धरणातून सिडकोला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला, तर दुसरीकडे पाथर्डी येथील जलकुंभातून इंदिरानगर आणि सिडको विभागाल पाणीपुरवठा करण्यासाठी एकच जलवाहिनी आहे. त्यावरील व्हॉल्व्हमुळे पाण्याची पळवापळवी होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे या जलकुंभातून इंदिरानगर आणि सिडकोसाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला गेला.