सिडकोत पथक येताच व्यावसायिक दुकाने बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:30 AM2018-06-24T00:30:03+5:302018-06-24T00:30:17+5:30
प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात आली असता, कारवाईच्या भीतीपोटी व्यावसायिकांनी दुकाने बंद करून स्वत:ची सुटका करून घेतली;
सिडको : प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात आली असता, कारवाईच्या भीतीपोटी व्यावसायिकांनी दुकाने बंद करून स्वत:ची सुटका करून घेतली; मात्र या मोहिमेत बारा व्यावसायिकांवर कारवाई करीत सुमारे तीनशे पंचवीस किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
प्लॅस्टिकबंदी लागू होताच पहिल्याच दिवशी मनपा सिडको विभागाच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे, विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली. पवननगर भागातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सावतानगर, त्रिमूर्ती चौक, अंबड-लिंकरोड भागातील बारा व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे कारवाई करीत साठ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला व त्यांच्याकडून तीनशे पंचवीस किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.