सिडकोत सामाजिक प्रबोधनपर देखावे
By Admin | Published: September 6, 2014 10:21 PM2014-09-06T22:21:18+5:302014-09-06T22:21:18+5:30
सिडकोत सामाजिक प्रबोधनपर देखावे
सिडको : गणेशोत्सव काळात दरवर्षी धार्मिक, सांस्कृतिक, पौराणिक व सद्यस्थितीवर आधारित देखावे सादर करणाऱ्या सिडको परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांचा उत्सव यंदाच्या वर्षी कायम आहे. सिडकोतील बहुतांशी सर्वच मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी दिसत आहे.
जुने सिडको येथील सिडको वसाहत मित्रमंडळ दरवर्षी भव्यदिव्य देखावे सादर करतात. याआधी मंडळाने सप्तशृंगीमातेचा गड, वैष्णव देवी, ३० फुटी हनुमान, कालरात्री देवी यांसह पर्यावरण संवर्धन आदि देखावे सादर केले आहे. यंदाच्या वर्षी मंडळाने विष्णू भगवान अवतार- निसर्ग सेवा हिच ईश्वर सेवा हा देखावा सादर केला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष किरण खांडरे यांनी सांगितले. गाण्यांच्या तालावर विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याचे मंडळाचे संस्थापक प्रवीण तिदमे यांनी सांगितले.
तुळजाभवानी चौक येथील सिद्धिविनायक मित्रमंडळाने यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने भव्य गणेशमूर्तीची स्थापना करून देखावा सादर केला असल्याचे मंडळाचे संस्थापक विजय रणाते यांनी सांगितले. याबरोबरच तुळजाभवानी मित्रमंडळाने कृष्णलीला हा चलत देखावा सादर केला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दीपक कोथमिरे यांनी सांगितले. ओमकार मित्रमंडळाने तसेच विनायक मित्रमंडळाने भव्य गणेशमूर्ती देखावा सादर केला आहे.
संभाजी राजे युवक मित्रमंडळाने यंदाच्या वर्षी भव्य गणेशमूर्ती हा देखावा सादर केल्याचे सुमित ठाकूर यांनी सांगितले. तुळजा भवानी युवक मित्रमंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही जिवंत देखावा सादर करण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कपोते यांनी सांगितले. सद्भावना मित्रमंडळाने यंदाच्या वर्षी भव्य गणेशमूर्ती हा देखावा सादर केला आहे. याबरोबरच जय बालाजी मित्रमंडळाने सद्यस्थितीवर आधारित स्त्रीभ्रूणहत्त्या, पाणी वाचवा, जातीपातीचे राजकारण आदिंचा देखावा चित्रफितीद्वारे सादर केला आहे. मंडळाचे राजू देसले, गणेश गोसावी यांनी अभिनव संकल्पना मांडली. वीर सावरकर चौकातील शिवराज मित्रमंडळाने भव्य गणेशमूर्ती स्थापन केली आहे. राणाप्रताप चौकातील चातक ग्रुप फ्रेण्ड्स सर्कलच्या वतीने २२ फुटी विठ्ठलमूर्ती व वारकरी हा चलत देखावा सादर केला असल्याचे मंडळाचे संस्थापक अमर वझरे यांनी सांगितले.
शिवसेनाप्रणीत गणेश चौक मित्रमंडळाने अंजनीमाता व बाल हनुमानाचा चलत देखावा सादर केला असल्याचे मंडळाचे संस्थापक विष्णू पवार, अध्यक्ष रमेश उघडे यांनी सांगितले. मनसेप्रणीत गणेश चौक युवक मित्रमंडळाने बालगणेशाची वेगवेगळी रूपे व गणेशदर्शन हा देखावा चित्रफितीद्वारे सादर केला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनवणे यांनी सांगितले.
सावतानगर येथील श्री साई समर्थ कला, क्रीडा, सांस्कृतिक मित्रमंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आहेत. मंडळाचे संस्थापक मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. शुभम पार्क येथील शिवराज कला व क्रीडा मित्रमंडळाने यंदाच्या वर्षी स्त्रीभ्रूणहत्त्याबाबतचा चलत देखावा सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांसह कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. त्रिमूर्ती चौक येथील त्रिमूर्ती सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळाने ज्योतिबाच्या नावानं चांगभलं हा चलत देखावा सादर केला आहे. मंडळाचे संस्थापक आमदार नितीन भोसले, अध्यक्ष गोपी पगार प्रयत्नशील आहेत. उपेंद्रनगर येथील अण्णा भाऊ साठे आदर्श भाजी मार्केट मित्रमंडळाने लालबागचा राजा गणेशमूर्ती साकारली आहे. मंडळाच्या संस्थापक मीरा साबळे यासह सचिन महाले, गणेश गोरे, बाळू साळवे, त्र्यंबक भास्कर, विलास भालेराव, संजय भोई, अमोल शेळके, विनोद बडगुजर आदि प्रयत्नशील आहेत. उंटवाडी सिटी सेंटरमॉल येथील सह्याद्री युवा फाउंडेशनच्या वतीने भव्य गणेशमूर्ती व डेकोरेटीव्ह लाईटिंग हा देखावा सादर केला असल्याचे मंडळाचे मुख्य प्रवर्तक किशोर घाटे, अध्यक्ष रोशन घाटे यांनी सांगितले. (वार्ताहर)