सिडकोत बचतगटाच्या महिलांची लाखोंची फसवणूक
By admin | Published: September 8, 2015 11:44 PM2015-09-08T23:44:09+5:302015-09-08T23:45:41+5:30
कर्जाचे आमिष : धमकी देत संशयितांचे पलायन
नाशिक : बचतगटातील महिलांनी व्यवसायासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवत तिघा महिलांची आठ लाख तीस रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी मनाली प्रणव घोष (३१, रा़ चंद्रलोक हॉटेलमागे, राणेनगर स्टॉप, सिडको) यांनी या फसवणुकीबाबत अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ दरम्यान, या घटनेमुळे बचतगटातील महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटीलनगरच्या स्वामी समर्थ केंद्राजवळ राहणारे संशयित रविकांत रत्नाकर जोशी, गौरी रविकांत जोशी, अश्विनी शिवकुमार बाजपेयी यांनी परिसरातील महिलांचा विश्वास संपादन करून बचतगटाची स्थापना केली़ त्यांच्याकडे परिसरातील महिलांनी २०१२ ते २०१४ या दोन वर्षांच्या कालावधीत या तिघांकडे नियमितपणे पैसे भरले़ या तिघा संशयितांनी महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते़
दरम्यान, बचतगटातील महिलांनी पैशांची तसेच व्यवसायासाठी कर्जाची मागणी केली असता संशयित जोशी दाम्पत्य व वाजपेयी हे पैसे घेऊन फरार झाले असून, याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यास कुटुंबीयांना धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)