सिडकोत पालेभाज्यांचे भाव कडाडले
By admin | Published: June 3, 2017 12:29 AM2017-06-03T00:29:01+5:302017-06-03T00:36:17+5:30
सिडको : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भाजीबाजारांची आवक घटल्यामुळे सिडको भागातील बाजारपेठांमध्ये काही ठिकाणी शुकशुकाट दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी भाजीबाजारांची आवक घटल्यामुळे सिडको भागातील काही बाजारपेठांमध्ये तुरळक तर काही ठिकाणी शुकशुकाट दिसून आला. विक्रेत्यांकडून आहे तो माल मात्र दुप्पट भावाने विक्री केला जात असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी बेमुदत संपावर गेल्याने सिडको भागातील पवननगर व शिवाजी चौक या ठिकाणी तुरळक, तर उपेंद्रनगर व त्रिमूर्ती चौकात मात्र शुकशुकाट दिसून आला. शेतकरी हे बेमुदत संपावर जाणार असल्याने संप सुरू होण्याच्या आधीच भाजीपाला विक्रेत्यांनी जादा माल भरून ठेवला होता. परंतु आज दुसऱ्या दिवशी विक्रेत्यांकडील माल हा कमी राहिल्याने त्यांनी आज दुप्पट भावाने भाजीपाला विक्री केला . सिडकोतील नेहमी गजबतलेला भाग व मुख्य बाजारपेठ असलेल्या पवननगर, त्रिमूर्ती चौक, शिवाजी चौक व उपेंद्रनगर भागात या संपाचा परिणाम जाणवला. या भागात सकाळ व सायंकाळच्या सुमारास कायमच गर्दी असताना शुक्रवार मात्र शुकशुकाट जाणवत होता. एकूणच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपचा परिणाम हा सिडको भागातील बाजारपेठांमध्ये जाणवू लागला असून, अधिक भावाने भाजीपाला विकत घ्यावा लागत असल्याने ग्राहकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. संपच्या पहिल्या दिवशी पाथर्डीफाटा येथे सीटूच्या वतीने निदर्शने करीत संपाला पाठिंबा दर्शविला शुक्रवारी दुसऱ्या दिवशी मात्र सिडको व अंबड भागात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.