कोथिंबीर जुडी एक रुपयाला
By Admin | Published: August 8, 2016 12:03 AM2016-08-08T00:03:35+5:302016-08-08T00:03:43+5:30
आवक वाढली : बाजार समितीत शेतकऱ्यांनी फेकली कोथिंबीर
पंचवटी : महिन्याभरापूर्वी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या कोथिंबीरला रविवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत मातीमोल बाजारभाव मिळाला. लागवड खर्च तर सोडाच गाडी भाडेही निघाले नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून कोथिंबीर बाजार समितीत फेकून देत घरचा रस्ता धरला.
रविवारी बाजारसमितीत कोथिंबीर १०० रूपये शेकडा दराने विक्र ी झाली. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना भरपुर पाणी मिळत आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. रविवारच्या दिवशी बाजारसमितीत प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे ढासळले. महिन्याभरापूर्वी १९० रूपये प्रति जुडी दराने कोथिंबीर विक्र ी झाली होती. रविवारच्या दिवशी काही शेतकऱ्यांनी आणलेला माल ओला असल्याने त्या मालाचा लिलाव झालाच नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने ती कोथिंबीर बाजारसमितीत टाकून दयावी लागली. सुमारे १५ ते २० वक्कल शेतकऱ्यांनी बाजारसमितीत टाकून देत घरचा रस्ता धरला. काही कोथिंबीरच्या मालाचा लिलाव झाला परंतु एक रूपया प्रति जुडी असा मातीमोल बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. बाजारसमितीत रविवारी काही कोथिंबीरच्या मालाला ५ तर काही कोथिंबीरला २० रूपये प्रति जुडी असाही बाजारभाव मिळाला. (वार्ताहर)