कोथिंबीर १५० रुपये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 01:25 AM2021-10-06T01:25:57+5:302021-10-06T01:27:07+5:30
येथील बाजार समितीत एक लाखाहून अधिक जुडी कोथिंबीरची आवक होऊनही कोथिंबिरीचे दर वाढले असून, मंगळवारी सायंकाळी कळवण तालुक्यातील शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला १५० रुपये, तर दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीला प्रत्येकी १३० आणि १३६ रुपये जुडीचा दर मिळाला. केवळ ७० जुड्यांच्या विक्रीतून शेतकऱ्याला सुमारे दहा हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले.
नाशिक : येथील बाजार समितीत एक लाखाहून अधिक जुडी कोथिंबीरची आवक होऊनही कोथिंबिरीचे दर वाढले असून, मंगळवारी सायंकाळी कळवण तालुक्यातील शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला १५० रुपये, तर दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीला प्रत्येकी १३० आणि १३६ रुपये जुडीचा दर मिळाला. केवळ ७० जुड्यांच्या विक्रीतून शेतकऱ्याला सुमारे दहा हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. पावसामुळे परजिल्ह्यांमधील भाजीपाल्याचे नुकसान झाले असल्याने तेथील स्थानिक बाजारात भाजीपाल्याची आवक खूपच कमी झाली आहे. यामुळे मुंबई, पुणे, गुजरात येथील बाजारपेठांमध्ये नाशिकच्या भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. यामुळे परजिल्ह्यांतील व्यापारी नाशिक येथे खरेदीसाठी येत आहेत. मंगळवारी नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीची एक लाख १६ हजार जुडी इतकी आवक झाली होती. गावठी कोथिंबीर अधिक टिकाऊ असल्याने तिला चांगला दर होता. कळवण तालुक्यातील इंशी येथील शेतकरी दगा बंगाळ यांनी ७० जुड्या गावठी कोथिंबीर आणली होती. या कोथिंबिरीला १५ हजार पाच रुपये शेकडा इतका भाव जाहीर झाला. चंद्रकांत निकम यांच्या शिवांजली व्हेजिटेबल कंपनीमार्फत संतोष भुजबळ या व्यापाऱ्याने ही कोथिंबीर खरेदी केली. कळवण तालुक्यातीलच गोसरणे येथील भास्कर रामसिंग जाधव यांच्या २३४ जुड्यांना १३ हजार ६०० रुपये शेकडा, तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला १३ हजार रुपये शेकडा इतका दर मिळाला. संतोष भुजबळ आणि बागुल या व्यापाऱ्यांनी या कोथिंबिरीची खरेदी केली.
पुणे, मुंबईत जातो ५० टक्के माल
सोलापूर, सांगली, पुणे या भागात पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे नाशिक येथील भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात भाजीपाला जात असून मुंबई आणि पुणे शहरात जवळपास ५० ते ६० टक्के भाजीपाला जात असल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.