रविवार कारंजावर गुंडांची सिनेस्टाइल दहशत

By admin | Published: January 16, 2017 01:45 AM2017-01-16T01:45:59+5:302017-01-16T01:46:12+5:30

एकावर प्राणघातक हल्ला : चौघा संशयितांपैकी एकास अटक

Cineaste panic of the goons Sunday | रविवार कारंजावर गुंडांची सिनेस्टाइल दहशत

रविवार कारंजावर गुंडांची सिनेस्टाइल दहशत

Next

 नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढण्यासाठी रविवार कारंजा भागात फुलेनगरच्या काही गुंडांनी सिनेस्टाइल पध्दतीने भररस्त्यात उघडपणे धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका जागरूक नागरिकाने त्यांना हटकले असता त्या गुंडांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलेनगर येथील तीन ते चार गुंड दिंडोरीनाका, रामवाडी, घारपुरे घाटमार्गे रविवार कारंजावर आले. त्यांच्या हातात काही शस्त्रे होती. सदर गुंड दुचाकीवरून जाताना कोयत्यासारखे शस्त्र फिरवित दहशत माजविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास केला. यावेळी रविवार कारंजा येथून जाणारे राजेंद्र लक्ष्मण काशिद यांनी (४७, रा. सीतागुंफा) संबंधितांना कोयता का फिरविता, असे विचारले असता त्यांनी दुचाकीवरून उतरून काशिद यांच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला केला; मात्र काशिद यांनी डावा हात बचावासाठी डोक्यावर घेतल्याने कोयत्याचा घाव हाताला लागून ते गंभीर जखमी झाले. हाताला मोठ्या प्रमाणात जखम झाल्याचे बघून गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी काशिद यांना बघून काही नागरिक तेथे आले व त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी काशिद यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविले.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ तपासचक्रेवेगाने फिरवून चौघा संशयितांपैकी फुलेनगर परिसरातून संशयित किरण कोकाटे यास अटक केली आहे. त्याचे सर्व साथीदार फरार असून, त्यांची ओळख पटली आहे. लवकरच त्यांनाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. काशिद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी संशयित गुंडांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cineaste panic of the goons Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.