पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:11 AM2018-07-23T00:11:15+5:302018-07-23T00:11:35+5:30
प्रभाग ३० मध्ये अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे यांनी त्रस्त नागरिकांसह पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
इंदिरानगर : प्रभाग ३० मध्ये अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने प्रभागाचे नगरसेवक श्याम बडोदे यांनी त्रस्त नागरिकांसह पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. गेल्या एक वर्षापासून प्रभाग ३० मध्ये पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच गेल्या दहा दिवसांपासून पांडवनगरी, कलानगर, श्रद्धाविहार कॉलनी, शिव कॉलनी, रॉयल गार्डन, एकता कॉलनी, सार्थनगर यांसह परिसरात ऐन पावसाळ्यात आणि गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही अत्यंत कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही परिसरातील महिला वर्गास पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
नगरसेवक बडोदे यांनी रविवारी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चव्हाण यांना भेटून त्यांना परिसरातील पाणीपुरवठा नियोजनाअभावी नेहमीच अत्यंत कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली. यावेळी महिला आणि नागरिकांनी चव्हाण यांना घेराव घातला. महापालिकेचे सर्व कर भरूनसुद्धा आम्हाला नेहमीच कृत्रिम पाणीटंचाई सामोरे जावे लागते यांसह विविध प्रश्न करीत धारेवर धरले होत. पाणीपुरवठा होत असलेल्या पाथर्डी फाटा येथील जलकुंभाची जलसाठ्याची पाहणी सुद्धा केली. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरेश न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराचे निवेदन त्यांना देण्यात आले निवेदनावर सुमारे पन्नास नागरिकांच्या स्वाक्षरी आहे. इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीही अनेकवेळा केली आहे.
गेल्या वर्षभरात अनेकदा निवेदने
होळीच्या दिवशी नगरसेवकांसह सुमारे दीडशे महिलांनी राजे छत्रपती चौकात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांना घेराव घालून बोंबाबोंब आंदोलन केले होते. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधिकाºयांनी दिले होते. तरीही परिस्थिती ‘जैसे थेच’ आहे. पावसाच्या गढूळ पाण्यामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे जलकुंभ भरले जात नसल्याचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी सांगितले.