नागरिकांची उडाली तारांबळ
By admin | Published: June 4, 2017 02:17 AM2017-06-04T02:17:08+5:302017-06-04T02:17:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मान्सूनपूर्व पावसाने शनिवारी दुपारी शहराला झोडपले. वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने नागरिकांची तारांबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मान्सूनपूर्व पावसाने शनिवारी दुपारी शहराला झोडपले. वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीने नागरिकांची तारांबळ उडाली.
गेल्या दोन दिवसांत शहरात ढगाळ वातावरण झाल्याने उष्मा अधिक वाढला होता. यामुळे नाशिककर घामाघूम होत होते. शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरीदेखील कमाल तपमानाचा पारा ३७ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली.
दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडासह पावसाला सुरुवात झाली. अवघ्या पंधरा मिनिटांतच शहराचे रस्ते जलमय झाले होते. महापालिकेच्या भुयारी पावसाळी गटारी तुंबल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक ठिकाणी चेंबर तुडुंब भरून रस्त्यावर वाहत होते. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात ठिकठिकाणी वृक्ष कोसळल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने कुठल्याही घटनेत जीवितहानी झाली नाही. दुपारी पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटांतच शिंगाडा तलाव अग्निशामक मुख्यालय, पंचवटी, सिडको, सातपूर उपकार्यालयांचे दूरध्वनी खणखणन्यास सुरुवात झाली. अर्ध्या तासाच्या अंतरावर शहरासह उपनगरांमध्ये सुमारे पंचवीस ते तीस ठिकाणी झाडे कोसळल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान विविध ठिकाणी कोसळलेली झाडे हटविण्याचे काम करत होते.
पहिल्याच पावसामुळे शहर परिसरातील जवळपास सर्वच रस्ते जलमय झाले होते. परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागत होते. परिसरातील रस्त्यांना काहीकाळ कालव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.