सुरगाणा तालुक्यात पाणीटंचाईने नागरिक हैराण
By Admin | Published: March 23, 2017 12:08 AM2017-03-23T00:08:35+5:302017-03-23T00:08:48+5:30
सुरगाणा : तालुक्यातील कुकुडमुंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दांडीची बारी येथे दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.
सुरगाणा : तालुक्यातील कुकुडमुंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दांडीची बारी येथे दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. येथे त्वरित टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दांडीची बारी हे गाव उंचावर असल्याने येथे दरवर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाईची झळ बसण्यास सुरुवात होते. २२४ लोकसंख्या असलेल्या या गावास पाणीपुरवठा करण्यासाठी गावाजवळच एक विहीर आहे. पावसाळ्यात विहिरीला आलेले पाणी साधारणत: डिसेंबरअखेरपर्यंत पुरते. मात्र त्यानंतर तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गावापासून सुमारे दोन कि.मी. डोंगर उतारावरील दरीत असलेल्या एका झऱ्याचा आधार येथील ग्रामस्थांना घ्यावा लागतो. या झऱ्यात रात्रभर साठलेले पाणी घेण्यासाठी पहाटपासूनच रांग लागते.येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी गावात मिळावे या उद्देशाने गुजरात राज्यातील सत्यसाईबाबा ट्रस्टने गावाजवळ बोअरवेल करून दिली. परंतु काही दिवसांतच या बोअरवेलचे पाणी आटले व परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. सद्य परिस्थितीत गावाजवळील विहिरीने तळ गाठला आहे. (वार्ताहर)