उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 04:51 PM2019-03-20T16:51:11+5:302019-03-20T16:51:16+5:30
खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.
खामखेडा : गेल्या चार-पाच दिवसांपासून अचानक उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.
सध्या सर्वत्र शेतीकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने शिवारात सर्वत्र कांदा काढण्याचे काम जोमात आहे. परंतु कडक उन्हामुळे शेतीत काम करणारे शेतमजुरांनी कामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. मजूर सकाळी आठ वाजता शेतात जाऊन अकरा वाजेपर्यंत काम करतात. आणि अकरा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत शेतातील झाड्याच्या सावलीत आराम करताना दिसून येत आहे. चार वाजेनंतर पुन्हा सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात काम करतात. गाय, बकऱ्या, मेंढ्या चारणारे गुराखीसुद्धा सकाळी लवकर आपली जनावरे चारण्यासाठी नेऊन दुपारी नदीकिनारी किंवा शेतातील झाडाच्या सावलीखाली आपली जनावरे उभी करून आराम करणे पसंत करत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळाच्या वेळेतही बदल केला आहे. दुपारी भरणारी शाळा सकाळ सत्रात केल्या आहेत. या कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेस कोणीही बाहेर फिरताना दिसून येत नाही. दुपारच्या वेळेस बाहेर फिरणारे नागरिक टोपी किंवा उपरणे डोक्यावर घेऊन बचाव करताना दिसत आहे. प्रचंड उखडा असल्याने दुपारच्या वेळेस पंखासुद्धा गरम हवा फेकत असल्याने लोक झाडाच्या सावलीखाली आराम करणे पसंत करीत आहेत. चालू वर्षी मार्च महिन्यातच उन्हाचा चटका बसत असल्याने एप्रिल-मे महिना कसा जाईल यांच्यावर नागरिकतिं चर्चा होत आहे.
कडक उन्हामुळे अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शिवारातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. उन्हामुळे शेतातील पिकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासू लागली आहे. सकाळी पाणी भरूनही कडक उन्हामुळे सायंकाळी जमीन कोरडी दिसून येत आहे. तेव्हा पिके कशी जतन करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.