नागरे खुनाचा कट कारागृहातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:39 AM2018-07-25T00:39:48+5:302018-07-25T00:40:07+5:30
ठक्कर बजारजवळील जाधव खुनातील साक्षीदार रामवाडीतील किशोर नागरे याच्या खुनाचा कट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून रचण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलेला सराईत गुन्हेगार व्यंकट मोरे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली़
नाशिक : ठक्कर बजारजवळील जाधव खुनातील साक्षीदार रामवाडीतील किशोर नागरे याच्या खुनाचा कट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून रचण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलेला सराईत गुन्हेगार व्यंकट मोरे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली़ किशोर नागरे याचा १० जुलै २०१८ रोजी मध्यरात्री तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली़ या प्रकरणी संशयित शुभम निवृत्ती पांढरे (रा. लोणार लेन), अविनाश उर्फ वामन्या रावसाहेब वाणी आणि एका अल्पवयीनास पोलिसांनी अटक केली होती. या तिघांच्या चौकशीत नागरेचा खून हा हल्लेखोरांसोबतचे पूर्ववैमनस्य व व्यंकट मोरेच्या सूचनेवरून झाल्याचे समोर आले़ तसेच या तिघा संशयितांपैकी अल्पवयीन संशयित हा व्यंकट मोरेच्या संपर्कात होता़ कारागृहातील मोरे यास न्यायालयात तारखेसाठी आणल्यानंतर या कटाची माहिती देण्यात आली होती़ पंचवटी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये मोरेला शनिवारी ताब्यात घेतल्यानंतर चार दिवसांची कोठडी मिळाली होती़ याकालावधीत त्याची कसून चौकशी करण्यात आली असून, कोठडीची मुदत संपल्याने त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते़ दरम्यान, पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी नागरे खून प्रकरणात व्यंकट मोरेचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आल्याचे सांगितले़ कारागृह अगर न्यायालयादरम्यान संशयितांनी पत्र, चिठ्ठी अगर प्रत्यक्ष संपर्क साधून कटाची कल्पना दिली होती का? याबाबत सखोल तपास सुरू असून, चौकशीत आणखी बाब समोर येणार आहेत़