कळवण शहरातील रस्ते कामात दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:14 PM2020-10-23T22:14:31+5:302020-10-24T02:52:47+5:30

कळवण शहरातील रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा व दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी रस्ता कामांची पाहणी करून ठेकेदाराच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

Citizens angry over delay in road works in Kalvan city | कळवण शहरातील रस्ते कामात दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांची नाराजी

दरेगाव ते पिळकोसदरम्यान आठंबे पुलाच्या कामाची पाहणी करताना आमदार नितीन पवार. समवेत अविनाश पाटील, योगेश पाटील, महेंद्र पवार, भूषण पगार, राजेंद्र भामरे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देनाराजीचा सूर : आमदार नितीन पवार यांनी केली पाहणी; कामे दर्जात्मक पूर्ण करण्याची सूचना

कळवण : शहरातील रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा व दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी रस्ता कामांची पाहणी करून ठेकेदाराच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 
हायब्रीड अन्यूइटीअंतर्गत होणाऱ्या दरेगावपासून नांदुरी ते कळवण - पिळकोस या कळवण तालुका हद्दीतील रस्त्याच्या कामाची आमदार नितीन पवार यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत पहाणी 
केली. सर्वाधिक रहदारींच्या या रस्त्यावरील चढउतार, पूल, मोरी आदी अनुषंगिक कामांचा समावेश करून रस्ता कामात सुधारणा करणे  अपेक्षित असल्याचे पवार यांनी सांगितले. 
त्याचबरोबर कळवण  शहरातील रस्त्याच्या कामात  सुधारणा करावी, रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे  दुकानदार व व्यावसायिक यांचे नुकसान होते. त्यामुळे कामे दर्जात्मक व युद्धपातळीवर पूर्ण करण्याची सूचनाही पवार यांनी यावेळी केली.  दरेगाव ते नांदुरी चढउताराच्या रस्त्याची सुधारणा करावी, आवश्यक तेथे रस्ते सरळ व सुरक्षित करावे, आठंबे येथे पुलाची उंची व रुंदी वाढवावी अशी  मागणी नांदुरी, दरेगाव, गोबापूर, आठंबे  येथील ग्रामस्थांनी आमदारांकडे पाहणी दौऱ्यात केली. 
याशिवाय, नवी बेज, भादवण, पिळकोस येथील नागरिक व शेतकऱ्यांनी निवेदन देऊन रस्ते कामात नवीन कामांचा समावेश करण्याची मागणी केली. नामपूर - कळवण  ते वणी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. स्वतंत्र यंत्रणा या रस्त्यावर कार्यान्वित असताना एकही अधिकारी व कर्मचारी या कामावर आढळून येत नसल्याने ठेकेदार व मजूर यंत्रणा यांच्या भरवशावर रस्ता सुधारणा करण्याचे काम सुरू  असल्याची तक्रार नागरिकांनी आमदारांकडे केली.  वणी-नांदुरी ते कळवण हा ठिकठिकाणी वळण व चढउताराचा रस्ता आहे. तेथे वळण सरळ करण्यासाठी संधी असताना दुर्लक्ष झाले असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

Web Title: Citizens angry over delay in road works in Kalvan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.