पंचवटीत संचारबंदीतही नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:27 PM2020-03-31T22:27:16+5:302020-03-31T22:28:00+5:30
हटकले तर विविध कारणे देऊन स्वत:ची सोडवणूक करून घेत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : परिसरात नागरिकांकडून जमाबंदीच्या आदेशाला हरताळ फासण्यात येत असून, रस्त्यावर नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत. पोलिसांनी हटकले तर विविध कारणे देऊन स्वत:ची सोडवणूक करून घेत असल्याचे चित्र आहे.
कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी शासन स्तरावर सर्वोपरी उपाययोजना राबविली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे संचारबंदीला नागरिकांनी सुरुवातीला दोन दिवस प्रतिसाद दिला खरा, मात्र त्यानंतर सर्व नागरिकांनी जमावबंदी आदेश झुगारून घराबाहेर पडू लागले आहेत. चौकात, गल्लीबोळात नागरिक एकत्र येऊन गप्पांचे फड रंगवित आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस वाहनातून फिरून नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना देत असून, पोलीस वाहन बघून तेव्हढ्यापुरते लपून बसणे अथवा पांगापांग केली जात आहे.
मात्र पोलिसांची पाठ फिरल्यावर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होऊ लागली आहे. काही रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले असले तरी, किराणा दुकान, भाजीपाला, मेडिकल दुकानात जाण्याचे बहाणे देत पोलिसांची दिशाभूल केली जात आहे.नागरिक ऐकत नसल्याचे पाहून शहरात अनेक रस्त्यांवर नेमणुकीस असलेल्या पोलिसांनीदेखील दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आल्यानंतरदेखील नागरिक
सूचना पालन करत नाही त्यामुळे पोलीस तरी काय करतील, असे
काही पोलीस कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले आहे.