नाशकात आरक्षीत जागेवर बांधकाम करणा-या बिल्डरला नागरीकांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:52 PM2017-11-22T14:52:22+5:302017-11-22T14:52:54+5:30
नाशिक- महापालिकेच्या आरक्षीत भूखंडावर विकासकाकडून सुरू असलेला शॉपींग कॉप्लेक्सचे बांधकाम स्थानिक नागरीकांनी विरोध करीत बंद पाडले. शहरातील आकाशवाणी टॉवरजवळ हे आंदोलन बुधवारी (दि. २२) करण्यात आले. या भूखंडाचे आरक्षण विकसीत करण्यासाठी मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने आंदोलनाला पाठींबा दिला. आणि रस्त्यावर तसेच न्यायालयातही लढाई करण्याची तयारी दर्शवली.
शहरातील गंगापूररोडवरील मौजे नाशिक शिवारातील सर्व्हे नं. ७०५ यातील अंतिम भूखंडावर खेळाचे मैदान, क्रिडांगण आणि शॉपींग सेंटरचे आरक्षण आहे. सदरचे आरक्षण ए आर म्हणजेच समावेशक आरक्षणामार्फत विकसीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तथापि, महापालिकेची आरक्षणे विकसीत न करताच बिल्डर्स आपल्या सोयीने शॉपींग कॉम्पलेक्स बांधत आहे. महापालिकेने त्याला खासगी विकासनासाठी रोड फ्रंड जागा देखील स्थलांतरीत करून दिले आहे. तथापि, समावेश आरक्षणामुळे आरक्षणाचा विकास साद्य होत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. समावेशक आरक्षणाव्दारे बिल्डराच्या सोयीने विकास केल्यास क्रीडांगण झाकले जाते तसेच त्यासाठी कमी जागा मिळते. गंगापूररोडवर महापालिकेच्या मालकीचे एकही मोठे क्रिडांगण नसून अशावेळी बिल्डरकडून आरक्षणाचा विकास अडचणीचा ठरणार असल्याने नागरीकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा घोळ सुरूच असून नागरीकांनी यासंदर्भात फाईली मागण्याचा प्रयत्न केल्यानंतरही महापालिका टाळाटाळ करीत आहे. माहितीच्या आधारे देखील उत्तरे देत नाहीत. त्यातच बिल्डरने शॉपींग कॉम्प्लेक्सचे काम सुरू केल्यानंतर येथील जॉगींग ट्रॅकवर फिरणे कठीण झाले. त्यामुळे बुधवारी (दि. १२) सकाळी नागरीकांनी धरणे आंदोलन सुरू केले. किशोर शिरसाट, संजय खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते तसेच गटनेता विलास शिंदे यांनी देखील येथे भेट देऊन पाठींबा दिला. त्यानंतर नागरीकांनी बिल्डरचे सुरू असलेले बांधकाम बंद पाडले.
आंदोलनात आनंदराव बोरसे, पंडितराव बिरारी, राजाराम टर्ले, सतीश मुसळे, मनोज देसले, चंद्राकांत भोई, सुशिला वाडीले, प्रियांका भोई, सविता सांगळे यांच्यासह अन्य नागरीक उपस्थित होते.