नागरिकांनो, नियमांचे गांभीर्याने पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:25 PM2020-08-14T22:25:07+5:302020-08-15T00:25:30+5:30
मालेगाव शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मनपातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अन्यथा शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त दीपक कासार यांनी दिली.
मालेगाव मध्य : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मनपातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अन्यथा शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त दीपक कासार यांनी दिली.
आयुक्त कासार म्हणाले की, हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातून कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळेच उद्योग, व्यवसाय सुरळीत होऊन जनजीवन पूर्वपदावर आले; मात्र नागरिकांकडून मास्क, सामाजिक अंतर व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत नसल्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने मनपातर्फे मन्सुरा, सहारा, केबीएच, मसगा महाविद्यालय येथील कोविड केंद्रातील आवश्यक सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली.
व्यवस्थेचा आढावा घेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहे. मसगा महाविद्यालयातील कोविड केंद्रात गृह विलगीकरणातील बाधितांसाठी औषधांची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले. मनपातर्फे ४०० आॅक्सिजन बेडची व्यवस्था तसेच २ हजार १६५ बेडची व्यवस्था. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांची यादी जाहीर करून रुग्णांवर उपचार करण्यासाठी बंधनकारक केले जाणार. खासगी रुग्णालयातील २० टक्के बेड राखीव असून, खासगी लॅबला चाचणीची परवानगी देण्यात आली. खाजगी रुग्णालयांवर देखरेखीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. रस्त्यावर मंडप लावण्यास बंदी करून आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. बाधितांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णालय व खासगी रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्यास कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त कासार यांनी सांगितले. बंद केंद्रे पुनर्स्थापित करण्यात आली. १४ सीसीसी केंद्रांमध्ये दोन हजार १६० बेडची व्यवस्था, ६ डीसीएचसी केंद्रात ४७५ बेड व डीसीएच केंद्र सहारा रुग्णालयात १३० अशा एकूण २ हजार ७६५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मन्सुरा येथे २५, मनपा ५५, हज हाऊस ५०, दिलावर हॉल ७० व सहारा रूग्णालय येथे २०० अशा ४०० आॅक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.