आधार केंद्र बंदमुळे नागरिकांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:27 AM2017-12-27T00:27:44+5:302017-12-27T00:28:30+5:30
अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अन्य केंद्रांवर अशीच परिस्थिती असून, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाºयांनी दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.
नाशिक : अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अन्य केंद्रांवर अशीच परिस्थिती असून, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाºयांनी दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला असून, बॅँका, भ्रमणध्वनी कंपन्या, गॅस एजन्सी, आयकर, विक्रीकर आदी खात्यांमध्ये आधार क्रमांकाशिवाय कोणतेही काम शक्य नसल्याने ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही अशा नागरिकांची व ज्यांनी यापूर्वी आधारकार्ड काढले परंतु आता त्याचे अपडेशन नसल्याने त्यांना पुन्हा आधार काढण्याची वेळ आली आहे. त्यातच शासनाने आधारकार्ड सेंटर महाआॅनलाइनशी जोडल्यामुळे तर खासगी आधार केंद्रे बंद करण्यात आली आहेत. शासनाकडून पुरविण्यात आलेल्या अधिकृत यंत्रावरच आधारकार्डची नोंदणी केली जात असून, नाशिक जिल्ह्याच्या एकूण मागणीचा विचार करता त्यामानाने सुरू केलेली केंद्रे अपुरी पडत आहेत. गेल्या आठवड्यात आधार केंद्रांबाबत होणारी नागरिकांची ओरड लक्षात घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकाºयांसमवेत बैठक घेऊन नवीन आधार केंद्रे सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या व जिल्हाधिकाºयांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळून सोमवारपासून १४ नवीन केंद्रे सुरू करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे मंगळवारी दिवसभर सुरूच होऊ शकली नाही. शनिवार ते सोमवार लागोपाठ तीन दिवस शासकीय सुट्या असल्यामुळे सदरचे आधार केंद्र बंद होते. गेल्या आठवड्यात आगाऊ नोंदणी केलेल्या नागरिकांनी सकाळी ९ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती; परंतु केंद्र सुरूच होऊ शकले नाही.
प्रशासनाचा दावा फोल; अनेक केंद्रे बंद असल्याची नागरिकांची तक्रार
यूआयडीने सदर केंद्राला सर्व्हिस दिली नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले व थोड्या वेळात चालू होईल असे सांगून वेळ मारून नेण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही केंद्रे सुरू होऊ शकली नाहीत. पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्नही फसल्याने अखेर नागरिकांना माघारी फिरावे लागले. शहरातील अन्य आधार केंद्रांचीही अशीच अवस्था असून, १७ केंद्रे सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी, त्यातील अनेक केंद्रे बंदच असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.