उघड्या विद्युत वाहिनीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 07:11 PM2021-08-10T19:11:46+5:302021-08-10T19:13:00+5:30
सटाणा : नामपूर हाउसिंग सोसायटी व बालाजी नगर, राम नगर ते बीएसएनएल ऑफिस भाक्षी रोड येथे लघुदाब व उच्चदाब भूमिगत झालेल्या कामात महावितरण कंपनीचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.
सटाणा : नामपूर हाउसिंग सोसायटी व बालाजी नगर, राम नगर ते बीएसएनएल ऑफिस भाक्षी रोड येथे लघुदाब व उच्चदाब भूमिगत झालेल्या कामात महावितरण कंपनीचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.
आरएडीआरपी योजनेत सटाणा शहरात रथ मार्गासाठी उघड्यावरील विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठी तसेच धोकेदायक पोल व वीज वाहिन्या अपघात होऊ नये म्हणून भूमिगत केबल टाकून उघड्या वीज वाहिन्या काढण्यात येणार आहे. नगर पालिकेने त्यावेळी रथ मार्गावरील रस्ता खोदण्याचा परवाना न दिल्याने भूमिगत वाहिनीचे काम नामपूर हाउसिंग सोसायटी व अभिमन्यू नगर तर उच्चदाब वाहिनी बालाजी नगर, रामनगर पासून बीएसएनएल ऑफिस पर्यंत स्थलांतरित केले.
या भूमिगत लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिनीचे काम पूर्ण झालेले असून केबल टाकण्याचे काम फेब्रुवारी सन २०१७ मध्ये पूर्ण झाले आहे. तेव्हापासून आजपर्यंत सदर भूमिगत वाहिनी चालूच केली नाही. शासनाने मंजूर केलेली भूमिगत केबलची कामे व त्यासाठी खर्च करण्यात आलेल्या लाखो रुपयांचा अपव्यय झाला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
उघड्यावरील जुन्या विद्युत वाहिनी काढून टाकण्यासाठी व जीवित हानी होऊ नये यासाठी भूमिगत केबलचे काम करण्यात आले होते. मात्र अद्यापही जुन्या लघुदाब व उच्चदाब वाहिन्या काढण्यात आलेल्या नसून जुन्याच वाहिनीवरच विद्युत पुरवठा सुरू आहे. जीवित हानी होऊ नये याकरिता टाकण्यात आलेली भूमिगत केबल तशीच पडून आहे.
नामपुर हाऊसिंग सोसायटी, अभिमन्यू नगर, बालाजी नगर ते बीएसएनएल ऑफिस पर्यंतच्या नागरिकांनी महावितरण कंपनीचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप केला असून जिवीत हानी टाळण्यासाठी लवकरात लवकर लघुदाब व उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिनी चार्ज करुन सुरू करावी व उघड्यावरील विद्युत वाहिन्या काढून टाकाव्यात अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (१० सटाणा २,३)