मनमाडच्या नागरिकांना कोरोनाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 08:51 PM2021-11-28T20:51:48+5:302021-11-28T20:52:37+5:30
मनमाड : शहर परिसरात कोरोनाचे रुग्ण कमी होताच आता मास्क घालणे काही नागरिकांनी जवळपास बंदच केले असल्याचे दिसून येत आहे. केवळ १० टक्केच नागरिक मास्क घालत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली होती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत होते. मात्र बेफिकिरी वाढली असून, बिनधास्त विनामास्क फिरत असून, रुग्णसंख्येचा आलेख उतरल्याने प्रशासनही सुस्त झाले आहे.

शहरात कोरोना संसर्ग वाढल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊन अनेकांना जीवास मुकावे लागले होते.मात्र आता कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी धोका मात्र कमी झालेला नाही तरीही नागरिकांच्या तोंडावरील मास्क अचानक गायब झाले असून, नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती पार निघून गेल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येते. त्यामुळे सर्रास विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली असून या विनामास्क फिरणाऱ्यांवरची कारवाईही थंडावली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी दररोज थोड्या फार प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.
सध्या लग्न कार्याचे दिवस असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली असून, नागरिकांचे एकमेकांत मिसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. तथापि, कोरोना टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर या कोरोनाला अटकाव करणाऱ्या त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी बाजारपेठ किंवा गर्दीच्या ठिकाणी कारवाई केली जात असल्यामुळे कोरोनाच्या भीतीने आणि कारवाईच्या भीतीपोटी नागरिक मास्क वापरत होते. आता मात्र ९० टक्के लोक विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. त्याचे कारण विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई थंडावली आहे.
फोटो : २८मनमाड कोरोना
मनमाड येथील बाजारपेठेत मास्कविना बिनधास्त फिरताना नागरिक.