महापालिकेच्या नोटिसांनी नागरिकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:57 PM2017-11-06T23:57:24+5:302017-11-07T00:21:39+5:30
जयभवानीरोड त्र्यंबकदर्शन सोसायटीच्या जागेतील श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्या जागेत आल्याने मनपाने अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून चिटकवलेली नोटीस बेकायदेशीर आहे. मनपा प्रशासनाने सदर धार्मिक स्थळ अतिक्रमण मोहिमेतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नाशिकरोड : जयभवानीरोड त्र्यंबकदर्शन सोसायटीच्या जागेतील श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्या जागेत आल्याने मनपाने अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून चिटकवलेली नोटीस बेकायदेशीर आहे. मनपा प्रशासनाने सदर धार्मिक स्थळ अतिक्रमण मोहिमेतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना त्र्यंबकदर्शन सोसायटी परिसरातील रहिवासी व भाविकांनी दिलेल्या म्हटले आहे की, श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्या स्व-मालकीच्या जागेमध्ये आहे. निवेदनावर मोहन औटे, वसंत औटे, संतोष गाडे, चेतन पाटील, श्याम खोले, संजय गायकवाड, विजय बोराडे, कविता गांगुर्डे, वैशाली पांडे, महेंद्र अहिरे, विक्रम औटे, स्वप्नील औटे, राजेश चौधरी आदींच्या सह्या आहेत. रस्त्यापासून मंदिर दूर असून, त्या मंदिराचा रहदारीला कुठलाही अडथळा होत नाही. सदर मंदिर हे भाविकांचे जागृत देवस्थान असून, परिसरातील भाविकांनी लोकवर्गणीतून हे छोटेसे मंदिर उभारले आहे. त्या ठिकाणी नित्यनियमाने धार्मिक कार्यक्रम होत असतात. मौजे देवळाली गट क्रमांक ४६/४/१, प्लॉट नं. १ येथील श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्याच खासगीमध्ये आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने सोसायटीच्या खासगी जागेत असलेले श्री भगवती माता मंदिर अतिक्रमण मोहिमेतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात सोबत जागेच्या मालिकेबाबतचे कागदपत्र जोडण्यात आले आहे.